भारतात पबजीचा खेळ खल्लास

अ‍ॅक्सेस मिळणारा सर्वर झाला बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पबजी गेमच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पबजी मोबाईल गेमचा सर्वर बंद करण्यात आलाय. भारत सरकारनं पबजी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता सर्वर बंद झाल्यानं या गेमचा अ‍ॅक्सेस पूर्णपणे बंद झालाय.

तरुणांना मोबाईल गेमचं खूळ लावणार्‍या पबजी गेमचा खेळ भारतात खल्लास झालाय. भारत सरकारनं महिन्याभरापूर्वी या गेमच्या अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर हे अ‍ॅप गुगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरवरून हटवलं होतं. मात्र ज्यांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप आधीपासूनच होतं, त्यांना पबजी खेळता येत होतं. मात्र या गेमचा अ‍ॅक्सेस यापुढे मिळणार नाही. कारण हा अ‍ॅक्सेस देणारा सर्वर बंद करण्यात आलाय. त्यामुळं हा गेम पुन्हा सुरू होउ शकतो, या पबजी प्रेमींच्या आशेला मूठमाती मिळालीय.

पबजी मोबाईल अ‍ॅपच्या प्रकाशनाचे हक्क आधी टेन्सेंट गेम्सच्या जवळ होते. टेन्सेंट चिनी कंपनी होती. भारत सरकारच्या आदेशानंतर ब्ल्यू होल स्टुडिओने या कंपनीसोबत भारतात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर आता पबजी मोबाईलचे प्रकाशनाचे हक्क पुन्हा पबजी कॉर्पोरेशनला मिळतील. पबजी कॉर्पोरेशनने म्हटलं की, 2 डिसेंबरपर्यंत हा गेम क्रॉफ्टन इंक सोबत जोडण्यात येईल.

लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले होते. तेव्हापासून चीन आणि भारतामध्ये सीमावादावरुन तणावाचे वातावरण आहे. या घटनेमुळे देशभरात नागरिकांकडून चीनविरोध उफाळून आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने चीनच्या मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पबजीचा देखील समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!