Fact Check | WhatsAppवर फिरणाऱ्या संप्रेषणाचा तो मेसेज खराय?

तुम्हालाही आला असेलच ना फॉरवर्ड मेसेज?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप वायरल झालाय. हा मेसेज आहे whatsappसंदर्भातला. whatsappवर उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, असा मेसेज आहे. मात्र, हा मेसेज खरा आहे की खोटा, याची शहानिशा युजर्स न करता हा मेसेज फॉरवर्ड करत आहेत. त्यामुळे अनेकजण गोंधळून गेले आहे. म्हणूनच गोवनवार्ता लाईव्हनं या मेसेजची पडताळणी केली. त्यानंतर काय सत्य समोर आलं. चला जाणून घेऊयात..

नेमका मेसेज काय आहे?

उद्यापासून whtsap आणी फोन काँल चे नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील: –
०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.
०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.
०३. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.
०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.
०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.
०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी घ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.
०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट किंवा व्हिडिओ … इ. पाठवू नका.
०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे … असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
१०. पोलिस अधिसूचना काढतील … त्यानंतर सायबर क्राइम … त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.
११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, … कृपया या विषयाचा विचार करा.
१२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी घ्या.
१३. कृपया हे सामायिक करा.गट अधिक जागरूक आणि सावध असले पाहिजेत.🙏ग्रुप सदस्यांना व्हाॅट्सफ बद्दल महत्त्वाची माहिती…
👇👇👇
वॉटसॲप वरील ✔ माहिती
१. ✔= संदेश पाठविला
२. ✔✔= संदेश पोहचला
३. दोन निळ्या ✔✔= संदेश वाचला
४. तीन निळ्या ✔✔✔= शासनाने संदेशाची नोंद घेतली
५. दोन निळ्या व एक लाल ✔✔✔= शासन तुमच्या विरूध्द कारवाई करू शकते
६. एक निळी व दोन लाल = शासन तुमची माहिती तपासत आहे
७. तीन लाल ✔✔✔= शासनाने तुमच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून लवकरच तुम्हाला न्यायालयाचे समन्स येईल.
जबाबदार नागरिक व्हा आणी तुमच्या मित्रांसोबत शेयर करा..
महत्त्वाचे म्हणजे पुढील ग्रुपमध्ये लवकर पाठवा..

पडताळणी

वरील मेसेज मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केला जातो आहे. त्यामुळे या मेसेजचं सत्य जाणून घेणं गरजेचंय. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेकांना हा मेसेज आला असेलच. व्हॉट्सअप वापरणारे अनेकदा सतर्क करायला लावणारे मेसेज आपल्या जवळच्या लोकांना पाठवत असतात. पण खरंच हा मेसेज खरा आहे की खोटा, याची शहानिशा न करता हा मेसेज पुढे पाठवणं चूक ठरेल.

गोव्याच्या शेजारील राज्य असलेल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वायरल मेसेजबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मेसेज फेक असून कुणीही त्यावर विश्वास ठेवू नये, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

खरंतर हा वायरल मेसेज तीन ते चार महिने जुना असल्याचंही कळतंय. हा मेसेज मुळात आधी इंग्रजीत होता. त्यानंतर काहीजणांनी हाच मेसेज मराठीत ट्रान्सलेट केला. प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आलेल्या व्हॉट्सअपवर पुन्हा हा मेसेज फॉरवर्ड केला जातोय. पण हा मेसेज मुळात खरा नाही, असंच आमच्या पडताळीत समोर आलंय.

काय म्हणालेत देशमुख?

सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज दिशाभूल करणारा आहे. सोशल मीडिया हा आपला अधिकार आहे, त्यावर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवत नाही. पण सामाजिक वातावरण दूषित करणारा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

एक ट्वीट करत अनिल देशमुखांनी या मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आणि सायबर क्राईम विभागाकडूनही या मेसेजबद्दल जागृती केली जाते आहे. अशाप्रकारची चुकीचा माहिती कुणीही पसरवू नये आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत खरं काय ते स्पष्ट करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे जर कुणी तुम्हाला किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रूपमध्ये अशाप्रकारची लिंक पाठवली असेल, तर त्यांना ही बातमी शेअर करायला विसरु नका.

एकमेकांच्या काळजीपोटी सतर्क राहण्याचे मेसेज पाठवणं चांगलं आहेच. पण खोटी माहिती पसरवून लोकांना गोंधळात टाकणं जास्त धोकादायक ठरेल. त्यामुळे काळजी घ्या आणि वाचत राहा गोवन वार्ता लाईव्ह.

हेही वाचा – WhatsApp ला नवीन पर्याय?

खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग उरलाय?

Tech Varta | १० हजारांपासून २० हजारपर्यंतचा मस्त फोन

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!