#Factcheck | लडाखमध्ये कोसळले भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर?

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः पाकिस्तानात हिंदू आणि ख्रिश्चनांच्या विरोधात वादग्रस्त विधान करण्यासाठी परिचित असलेल्या जैद हामिदने आपल्या ट्विटर हँडलवरून कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा फोटो शेअर केला आहे. भारतीय वायुसेनेचे एमआय 17 हेलिकॉप्टर लडाखमध्ये क्रॅश झाले आहे, असे तो म्हणतो. पाकिस्तानी पत्रकार Mubasher Lucman व Irmak Idoya नावाच्या ट्विटर अकाउंटवरून सुद्धा हा फोटो याच दाव्याने शेअर करण्यात आला आहे.
पडताळणी
वायुसेनेचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यास ती बातमी राष्ट्रीय वाहिन्यांवर झळकणे अपेक्षित असते. परंतु, अशा प्रकारची कोणतीच बातमी कोणत्याच चॅनल किंवा वेबसाईटवर दिसत नाही. तसेच, स्थानिक प्रसारमाध्मांतूनही याविषयीची बातमी झळकलेली नाही.
काय आहे फॅक्ट?
खरं काय आहे त्याचा शोध घेतला असता दोन वर्षांपूर्वीच्या फोटोशी हा फोटो मिळताजुळता असल्याचे आढळून आले. तर, हा फोटो ३ एप्रिल २०१८ चा आहे. केदारनाथ मंदिराजवळ एक हॅलिपॅडवर लँड करण्याचा प्रयत्न केला जात असताना हेलिकॉप्टरमध्ये आग लागली. तेव्हाची ही दुर्घटना, आणि त्याचाच हा फोटो.