चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

रणथंभौरमध्ये बाइकखाली आलेल्या चित्त्याचे फोटो व्हायरल

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष झाल्याच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचल्या आणि ऐकल्यात. पण राजस्थानमधील रणथंभौर नॅशनल पार्क (आरएनपी)मध्ये एका बिबट्याची ३ बाइक रायडर्सशी झालेली टक्कर सध्या चर्चेचा विषय ठरलीये. कारण कोणीतरी याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकलेत. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.

कुणी केले फोटो व्हायरल?

खरं तर बाईक रायडर्स आणि बिबट्याची टक्कर झाली त्यावेळी एक पर्यटक त्याच्या कॅमेऱ्यासह तिथे उपस्थित होता. या पर्यटकाचे नाव श्रीधर शिवराम आहे. त्याने या घटनेचे तपशील आपल्या फेसबुक टाइमलाइनवर फोटोंसह पोस्ट केलेत. मीडियामध्ये याविषयी बातम्या आल्यानंतर अनेकांनी या घटनेचे फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केलंय.

श्रीधर शिवराम त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात…

होळीच्या एक दिवस आधी (२८ मार्च २०२१) सकाळची सफारी केल्यानंतर आम्ही झोन १० आणि झोन ४ (नॅशनल पार्कच्या) ठिकाणी जायचं ठरवलं. दुपारी साधारण दीड वाजता आम्ही मुख्य रस्त्यावर पोहोचलो. त्या दिवशी होळी असल्यामुळे अनेक लोक पायी, बाईक तसंच गाड्यांवरून जाताना दिसले. रस्त्यावर ट्रॅफिक होतं. एके ठिकाणी काही लोक सेल्फी काढत होते. माझ्या गाईडला मी म्हणालो, “लोक या धोक्याच्या ठिकाणी फिरतायत आणि सेल्फी काढतायत. वाघ किंवा इतर जंगली प्राणी इथे कधीही येऊ शकतात.” गाईड फक्त हसला. जणू काही घडूच शकत नाही. तिथे रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटासा तलाव होता. आम्ही आमची गाडी तिथे पार्क केली. मग गाईड आम्हाला म्हणाला, “तयार व्हा… बिबट्या कधीही येऊ शकतो.” अन् तोच अचानक एक बिबट्या झुडपांमधून उडी मारून रस्ता ओलांडू लागला. पण दुर्दैवाने त्याच वेळी एक बाईक जवळून गेली. त्यावर तिघेजण बसले होते. बिबट्या थेट बाइकला धडकला आणि गाडी घसरली. बाकीची कथा चित्रं सांगतायत.

फोटोज आऊट, कमेंट्स इन

या घटनेच्या फोटोंवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्यात. त्यांच्यापैकी अनेकांनी जंगलात बेधडक बाईक चालवणाऱ्यांवर जोरदार टीका केलीये. त्या तिघा बाईकस्वारांना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकांकडून करण्यात येतेय. पण काहींनी बाईकस्वार तसंच बिबट्याला या अपघातात काही न झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. पण मीम्स बनवणाऱ्यांनी त्यांची सवय मात्र सोडलेली नाही… या व्हायरल झालेल्या फोटोजवर त्यांनी आपली क्रिएटिव्हिटी दाखवलीये.

गांभिर्याने विचार करण्याची गरज

विनोदाचा भाग वगळता, या घटनेवर गांभिर्याने विचार केला पाहिजे. जंगलं आणि शहरांमधलं अंतर सातत्याने कमी होतंय हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अर्थात हा दोष माणसांच्या माथी जातो. यामुळे माणसात आणि वन्य प्राण्यांमध्ये वारंवार संघर्षाच्या घटना घडल्यात. ही घटना याचं उत्तम उदाहरण आहे. श्रीधर शिवराम यांच्या पोस्टवरून असं दिसून येतंय की जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर लोकं उघडपणे फिरतायत.

हेही वाचाः ४५ वर्षांवरील व्यक्तींचे आजपासून लसीकरण, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

वन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आठवड्याचे चार दिवस सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी जंगलाचा मुख्य रस्ता खाजगी गाड्यांसाठी खुला असतो. वृत्तपत्रात सांगितलेय की या रस्त्यावर बाईक आणण्यावर बंदी नाहीये. पण, RNPचे मुख्य संरक्षक टीसी वर्मा यांनी वर्तमानपत्राला सांगितलेय की, सफारीच्या गजबजलेल्या दिवसांत त्यांनी खासगी गाड्यांच्या हालचालींवर आधीच बंदी घातली होती. मात्र, होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे वन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

हेही वाचाः गोव्यात बुधवारी २०० नव्या कोरोना रुग्णांचं निदान तर महाराष्ट्रात २००पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

वाघ, चित्ते आणि माणसांच्या भेटी सामान्य गोष्ट

गणेश मंदिर रोडवर वाघ, चित्ते आणि माणसं एकत्र दिसणं ही सामान्य गोष्ट झालीये. याचं प्रमुख कारण म्हणजे या रस्त्यावर येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. किल्ल्याच्या आत बांधलेल्या मंदिरात श्रीगणेशाच्या दर्शनासाठी माणसं इथे येत असतात. दरवर्षी जवळपास 12 लाख लोकं गणेशाच्या दर्शनासाठी इथे येतात. इथवर पोहोचण्यासाठी त्यांना जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या आतल्या भागात जावं लागतं. देवावरील श्रद्धेसाठी लोकं मोठा धोका पत्करतात, ज्यातून होळीच्या दिवशी घडलेल्या प्रकारांसारख्या घटना घडतात.

हेही वाचाः पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

श्रीधर शिवराम कोण आहेत?

या घटनेचे फोटो लोकांसमोर आणणारे श्रीधर शिवराम पेशाने गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. ते मुंबईतील एका गुंतवणूक कंपनीत संचालक आहेत. पण त्याचबरोबर निसर्गात त्यांना विशेष रुची आहे. श्रीधर शिवराम यांना निसर्गाला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करायला आवडतं. यासाठी ते बहुतेक वेळा जंगल सफारीवर जातात. होळीच्या दिवशी ते अशाच एका सफारीवर गेले होते. त्याचदरम्यान वरील घटना घडली. श्रीधर शिवराम सांगतात, गणेश मंदिर मार्गावर सर्वसामान्य लोक आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हे फोटोज मी सर्वांसमोर आणलेत. जर असं करण्यात मला थोडं जरी यश आलं तरी माझ्या उद्देश पूर्ण झाला असं मी समजेन.

हे फोटोज समोर आल्यानंतर जंगल आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने काम करणारे असे कार्यकर्ते आणि प्लॅटफॉर्म एक्टिव्ह झालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!