चक्क..पितृपक्षा साठी कावळा भाड्याने..!! व्हिडिओ व्हायरल

पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला. त्या कावळ्याच्या भोवती अनेक जण श्राद्धाच्या नैवेद्याची ताटं घेऊन फिरत आहेत. कावळ्याने ताटातल्या नैवेद्याला चोच लावल्यावर भाविकांना श्राद्धकर्म पूर्ण झाल्यासारखं वाटलं.

कावळे झालेत कमी

सध्या पितृपक्षात पितरांचं श्राद्ध घालण्यासाठी जिथे तिथे मोठी गर्दी पहायला मिळत होती. घरोघरी पितरांसाठी नैवेद्यही केला जात होता. या नैवेद्यातला घास कावळ्याने खाल्ला की श्राद्धकर्म पूर्ण होतं अशी श्रद्धा आहे. मात्र कावळेच कमी झाल्यामुळे भाविकांना ताटकळत राहावं लागलं.

पितृपंधरवड्यात जाणवते कावळ्यांचे महत्व

आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यानपिढ्या या प्रथा परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्या-पाड्यात आजही कायम पाळला जातो. पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र या दिवसांत त्यांची कावकाव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्यांनी चोच लावण्यासाठी त्यांची तासनतास घरांच्या छतावर वाट पाहिली जाते.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांनी नैवेद्य (घास) ठेवण्याची फार जुनी रूढी-परंपरा जुन्या काळापासून आजही चालत आली आहे. ही परंपरा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मानली जात आहे. तसेच शहरी भागातही ठिकठिकाणी ही परंपरा राखली जाते. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ आमवस्येला त्याची सांगता केली जाते.

पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार

पूजाविधी कर्मकांड करताना माणुसकी विसरली जात आहे हे सातत्याने समोर येतं. आता हा प्रकार समोर आल्याने श्रद्धेला कोणतं विकृत स्वरूप येत चाललंय हेच दिसून येतंय. 

हा व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की कुठला आहे याविषयी काही माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय. तसंच लोक हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!