कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांनी असा बजावला मतदानाचा हक्क

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील सक्रिय १,१८७ पैकी केवळ ३१ करोनाबाधित मतदारांनी शनिवारी मतदान केंद्रांत जाऊन मतदानाचा अधिकार बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यातील १५ आणि दक्षिण गोव्यातील १६ अशा ३१ बाधितांनी पीपीई कीट प​रिधान करून मतदान केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

उत्तर गोव्यातील शिवोली, कोलवाळ, खोर्ली, मये आणि होंडा येथील प्रत्येकी एक, हळदोणा येथील सहा, तर सुकूर आणि लाटंबार्से येथील प्रत्येकी दोन अशा पंधरा करोनाबाधित मतदारांनी मतदान केले. दक्षिण गोव्यात उसगाव-गांजे, कवळे, वेळ्ळी व खोला येथील प्रत्येकी एक, बेतकी-खांडोळा,
धारबांदोडा, रिवण येथील प्रत्येकी दोन, तर पैंगीण व कुठ्ठाळी येथील प्रत्येकी तीन अशा सोळा बाधितांनी मतदान केले आहे.

प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असतो, या न्यायाने राज्य निवडणूक आयोगाने करोनाबाधित होऊन घरी विलगीकरणात असलेल्यांना सायंकाळी ४ ते ५ या शेवटच्या तासात मतदानाची संधी दिली होती. बाधितांना पीपीई कीट पुरवून मतदान केंद्रांवर आणण्याचे निश्चित करून आयोगाने शनिवारी सकाळपासूनच त्यांच्यासाठीची तयारी केली होती. बाधित मतदान केंद्रांत आल्यानंतर त्यांच्यापासून करोनाचा प्रसार होऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली होती. बाधितांसाठी सर्व व्यवस्था केल्याने ते मोठ्या संख्येने मतदानासाठी येतील अशी आशा राज्य निवडणूक आयोगासह सरकारलाही होती​. पण घरी अलगीकरणात असलेल्या १,१५६ बाधितांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे टाळले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!