सेंगोल किंवा राजदंड; काय आहे याचे महत्व आणि इतिहास, जाणून घ्या सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी
- सेंगोल संसदेच्या नवीन वास्तूत ठेवण्यात येणार आहे
- त्याचा इतिहास चोल राजघराण्याशी संबंधित आहे.
- लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना 1947 साली सत्तांतरण करताना सुपूर्द केला होता.

गोवन वार्ता लाईव्ह वेब डेस्क 25 मे : 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी सेंगोल ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हा सेंगोल किंवा राजदंड माननीय सभापतींच्या आसनाजवळ ठेवण्यात येणार आहे. सेंगोल राजधर्म आणि न्यायाचे प्रतीक आहे. या सेंगोलकडे चोल वंशाच्या शक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते . एवढेच नाही तर जेव्हा इंग्रजांनी भारतातून त्यांची राजवट संपुष्टात आल्याची घोषणा केली, म्हणजेच स्वातंत्र्य घोषित केले, तेव्हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे हा सेंगोल सुपूर्द करण्यात आला. सध्या सेंगोल अलाहाबाद येथील संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

त्याचा इतिहास काय आहे
चोल राजवंश हा दक्षिण भारत आणि जगातील सर्वात दीर्घकाळ राज्य करणारा राजवंश मानला जातो. त्याची सत्ता 300 BC ते 13 व्या शतकापर्यंत होती. दुसरीकडे, चोल राजवटीत, जेव्हा जेव्हा राजाने एखाद्याला राजा म्हणून निवडले किंवा उत्तराधिकारी घोषित केले, तेव्हा तेव्हा या सेंगोलला सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून देण्यात आले. ज्याच्याकडे राजदंड त्याच्याकडे सत्ता . ही परंपरा चोंल राजवटीच्या अस्तापर्यन्त चालू राहिली . राजदंड सोन्याचा बनलेला होता, ज्यावर मौल्यवान दगड जडलेले होते.

सेंगोलचा अर्थ
सेंगोल (सेंगोल) या शब्दाची उत्पत्ती “संकु” या संस्कृत शब्दापासून झाली आहे. म्हणजे शंख. हिंदू धर्मात शंखाला खूप मान्यता आहे. राजेंद्र चोंल याने जेव्हा श्रीविजय राज्य खालसा केले तेव्हा तेथे आपले अधिकार सत्यापित करण्यासाठी या राजदंडाचा वापर केल्याचा ज्ञात इतिहास आहे. जेव्हा राजा एखाद्या विशेष कार्यक्रमाला जायचा किंवा त्याच्या अधिकारांचा वापर करायचा तेव्हाच सेंगोल वापरायचा. ऋषीमुनींनी विशेषतः शंखाचे वर्णन केले आहे. अनेक युद्धांमध्ये असाच शंखनाद असायचा. आजही मंदिरात किंवा घरात देवाची आरती केली जाते, त्यावेळी शंख वाजविला जातो. सेंगोलचा राजदंड न्याय्य-न्यायिक शासनाचे प्रतीक होता .

1947 मध्ये जेव्हा भारताला स्वतंत्र बहाल करण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित नेहरूंकडे सत्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी पंडित नेहरूंकडे कोणतीही योजना नव्हती, नंतर ते माजी राज्यपाल सी. राज गोपालाचारी यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी या सेंगोलचा वापर करण्याबाबत सुचवले. त्यावेळी हा सेंगोल तामिळनाडूतील सर्वात जुने मठ तिरुवदुथुराईजवळ होते. जे मध्यरात्री आणले गेले.

नंतर महंतांनी त्याची पूजा करून लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सुपूर्द केले गेले व शिष्टाईस अनुसरून माउंटबॅटनने सत्ता हस्तांतरण म्हणून पंडित नेहरूंना सेंगोल आणि पर्यायाने भारताचे स्वातंत्र्य बहाल केले व भारत ब्रिटिशांकडून भारतीयांकडे परत आला.

ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ बद्दल
- ब्रिटीश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंतप्रधान नेहरूंना विचारलेल्या प्रश्नापासून सुरू झालेल्या घटनांच्या मालिकेतून सेंगोलची उत्पत्ती शोधली जाऊ शकते .
- ऐतिहासिक लेखाजोखा आणि बातम्यांमधून असे दिसून आले आहे की माउंटबॅटन यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्ता हस्तांतरणाचे स्मरण होईल अशा चिन्हाबद्दल चौकशी केली.
- प्रत्युत्तर म्हणून, पंतप्रधान नेहरूंनी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचा सल्ला घेतला.
- राजगोपालाचारी, ज्यांना राजाजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी नेहरूंना तामिळ परंपरेची माहिती दिली ज्यामध्ये उच्च पुजारी सत्तेवर आल्यावर नवीन राजाला राजदंड देतात.
- चोल राजवटीत ही प्रथा पाळली गेली होती असे त्यांनी नमूद केले आणि असे सुचवले की ते ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या मुक्तीचे प्रतीक असू शकते. या ऐतिहासिक क्षणासाठी राजदंड मिळवण्याची जबाबदारी राजाजींनी घेतली.
- राजदंडाची मांडणी करण्याचे आव्हान पेलून राजाजींनी सध्याच्या तामिळनाडूतील थिरुवदुथुराई अथिनाम या प्रमुख धार्मिक संस्थेशी संपर्क साधला.
- त्यावेळी संस्थेच्या प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली.
- पूर्वीच्या मद्रासमधील ज्वेलर्स वुम्मीदी बंगारू चेट्टी यांनी हे सेंगोल तयार केले होते.
- तो पाच फूट उंचीवर उभा आहे आणि त्याच्या वर एक ‘नंदी’ बैल आहे, जो न्यायाचे प्रतिनिधित्व करतो.