“मराठी साहित्यातील मॅड-मॅन” भालचंद्र नेमाडे : हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ | जगण्याच्या अडगळीला समृद्ध करणारी कादंबरी

ऋषभ | प्रतिनिधी

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीची व्याप्ती खूप मोठी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून-स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत, हिंदुस्तान -पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीपासून ते विज्ञानयुगावर स्वार झालेल्या आधुनिक मानवापर्यंत. अश्मयुगीन किंवा त्यापेक्षाही प्राचीन मानवाचे बुद्धीवैफल्य ते आधुनिक मानवाचे बुद्धीविवेचन लेखकाने उत्तम रेखाटले आहे.
कादंबरीची कथा ही खंडेराव विठ्ठल या कथानायकाची. कथेचा नायक हा कथेचा सूत्रधारही आहे. तो शेतकरी समाजातील ध्येयपीडितांचे प्रतिनिधीत्व करतो. कादंबरीची जवळजवळ तीन चतुर्थांश कथा ही अर्धग्लानीत असलेया नायकाचे मनोविश्व उलगडते. ग्लानीत आलेल्या भयप्रवाहात नायक जेव्हा वाहत जातो तेव्हा मार्गात अनेक किनारे लागतात पण त्याचे शीड मात्र कुठल्याच किनाऱ्यावर लागत नाही. कुठला किनारा खडकाळ तर कुठे रेतीच रेती तर कुठले किनारे सहप्रवाशांच्या होड्यांनी काबीज केलेले. अंती नाव एका वेगळ्याच किनारी लागते. जेथून सुरुवात केली तिथेच. सुरुवात हाच शेवट! गजब कॉन्सेप्ट आहे.

अस्तित्ववाद आणि मृषावादाने शिंपलेल्या निवडुंगाच्या बागेतून नेत वाचकांना वास्तवाच्या प्रखरतेशी तोंडओळख करवून देण्याची ” मराठी साहित्यातील मॅड-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेमाडेंची लेखन शैली रुक्ष आणि वादातीत असली, तरी त्यास कुठेतरी भावनेचा ओलावा मात्र आहे. पण वाचक बऱ्याच अंशी खंडेरावांसोबत वास्तवाच्या वाळवंटात होरपळत राहतो आणि वृथा आस ठेवतो की या येथेच कुठेतरी आपण असे का आहोत? आपले अस्तित्व काय? वगैरे वगैरे

कथेत घडणारे प्रसंग आणि त्यामुळे आलेली वाचकांसमोरील पात्रें, काही जी नायकास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेली आणि काही अशीही ज्यांची सावली नायकाच्या मनातल्या पटलावर अजूनही दिसते आणि त्यांची भेट वाचकांस खंडेरावाच्या वागण्यातून सर्रास होते आणि त्यातूनच नायक घडत जातो हाच या कथेचा आत्मा आहे. काही प्रसंग तर हृदयास भिडून जातात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीस पात्र ठरणारी अनेक पात्रे कथेत येतात. काही प्रश्न उत्पन्न करतात तर काही बरेच काही सांगून जातात. पोटासाठी आटापिटा करणारे, शोषित, धन्याशी एकनिष्ठ असणारे, कलंदर, तऱ्हेवाईक, जिवाभावाचे, नाळ जोडलेले अशा अनेक प्रकारचे लोक कथेबरोबर प्रवास करत राहतात. नायक हा कुठल्याही आदर्शवादाकडे किंवा दृढ विचारसरणीकडे न झुकता स्वतःला घडवत राहतो, शोधत राहतो.

वर्षानुवर्षे चालत आलेली शेती म्हणजे एक दुष्टचक्रच. शेतकऱयांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे शेती. दुसरा मोठा शत्रू म्हणजे व्यापारी, दलाल. आणि तिसरा मोठा शत्रू म्हणजे, हमी भावाची फक्त हमीच देऊन खुर्ची टिकवणारे सरकार. नायकाचे शेतीबद्दलचे निरीक्षण आजही लागू पडते. आजही खेडोपाडी काही वेगळी स्थिती नाही. गरीब, अल्पभूधारक, कामकरी, कष्टकरी, मजूर, जिरायती, कोरडवाहू शेतकरी आजही झगडतो आहे.
जगाच्या पसाऱ्यात वावरताना पुस्तकी बुद्धीप्रपंचापेक्षा अनुभवाची शिदोरी वरचढ ठरते. उगाच म्हणून भेटलेला कुणी एखादा मौलिक ठेवा देऊन जातो. किंवा जवळचाच कुणी अक्कलहिशेबी मुबलक ठेव देवून जातो. काही गणितं सोडवण्यापेक्षा ती सोडून देण्यातच शहाणपण. पण प्रारब्धाचे(?) फटकारे सोसल्याशिवाय हे शहाणपण येत नाही. आयुष्याचा जमाखर्च कितीही काटेकोरपणे केला तरी आपण देणे लागतोच. असे खंडेरावाचे अर्ध-ग्लानीतले हे रुक्ष विचार कोणत्याही विवेकबुद्धी माणसाची मानसिकता पार बदलवून टाकण्यास सक्षम आहेत.

हिंदू कादंबरीची शेतीशी किंवा मातीशी नाळ खूप खोलपर्यंत जुळलेली आहे असं समजून येत. आपण कितीही प्रगती केली तरीही शेवटी आपल्याला आपल्या मूलभूत गरजांसाठी शेतीवर अवलंबून राहावं लागणार. मग आपण दुसऱ्या ग्रहावर का जाईना तिथेही सुरुवात शेतीपासून करावी लागणार हे दुर्लक्षित करण्यासारखं तर नाहीच. अजून हिंदुबद्दल सांगायचं तर, खंडेराव विठ्ठल या नायकाची सुरुवात हिंदुत झाली.
पण खंडेरावचा शेवट कधीच हिंदुपर्यंत मर्यादित नाही राहणार एवढं तर नक्कीचं. त्याचा शेवट त्याच्या वाचकांच्या शेवटासोबत होईल आणि जोपर्यंत खंडेराव विठ्ठलला वाचणारे सापडत राहतील तोपर्यंत तो जिवंत राहील अर्थातच खंडेरावचं नायक म्हणून अस्तित्व नेहमी शाश्वत राहील. आणि ज्या प्रकारे भालचंद्र नेमाडेंनी हिंदू लिहिली तो एक प्रकारचा आविष्कारच वाटला मला. एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यास भालचंद्र नेमाडेंनी दिलेली एक अप्रतिम भेट आहे , तिला काळ-वेळ यांचे कोणतेही बंधन नाही, आणि कधीच असणार नाही ! याच्यात काही वाद नाही की हिंदू , “रीड बिफोर यू डाय” ह्या यादीत येते.आणि तुम्ही जर मराठी वाचक असाल तर तुम्ही हिंदू एकदा तरी वाचायला हवीचं. आणि त्या समृद्ध अडगळीत आपले अस्तित्व शोधता आले तर आधीच चांगले !