भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची गुजरातच्या सागरी सीमेवर संयुक्त कारवाई, घातपाताचा मोठा कट लावला उधळून !

भारतीय हद्दीत पाकची नौका; ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त

ऋषभ | प्रतिनिधी

हायलाइट्स:

  • भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
  • शस्त्रासह, स्फोटके असलेली बोट पकडली
  • बोटमध्ये तब्बल ३०० कोटींचे ड्रग्स

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत सागरी सीमेजवळ पाकिस्तानी बोट रोखली. या बोटीतून शस्त्रास्त्रांसह तब्बल ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय, १० पाकिस्तानी ड्रग्ज माफियांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून त्यासोबतच ड्रग्ज नेटवर्कचे कनेक्शनही तपासले जात आहेत.

पाकिस्तानी मासेमारी बोट अल सोहली

तटरक्षक दलाने ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. तटरक्षक दलाने सांगितले की, एटीएस सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी मासेमारी बोट अल सोहलीला गुजरातमध्ये पकडण्यात आली. झडतीदरम्यान शस्त्रे, दारूगोळा आणि सुमारे ४० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. ज्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये आहे. पुढील तपासासाठी त्यांना बोटीने ओखा येथे आणले जाईल.

नेमका काय आहे प्रकार ?

गुजरात दहशतवाद विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने २५ आणि २६ डिसेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषा (आयएमबीएल) क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी ‘ICGS Arinjay’ हे जलद गस्त जहाज तैनात केले आहे.

‘ICGS Arinjay’

आयसीजीकडून प्राप्त माहितीनुसार पहाटे पाकिस्तानची मासे पकडणारी अल सोहेली नावाची एक बोट भारतीय समुद्री हद्दीत संशयितरित्या फिरताना आढळून आली. आयसीजीने त्यांना हटकल्यानंतरही बोटीवरील चालकांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर आयसीजीने त्यांना इशारा देण्यासाठी गोळीबारही केला, परंतु तरीही ती बोट थांबली नाही. यानंतर आयसीजीच्या जवानांनी ती बोट पकडली आणि चालक दलासह सर्वांना ओखा बंदरावर आणले.

मागील १८ महिन्यांमध्ये गुजरात एटीएस आणि आयसीजीचे हे सातवे संयुक्त अभियान आहे. तर ड्रग्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आल्याची ही पहिली घटना आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!