VIDEO | रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांना परवानगी देण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोव्यातील कोरोना योध्यांशी तसंच जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी गोव्यातील एक तास दिला हे गोंयकारांचं भाग्य, असं बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो प्रतिक्रिया देताना म्हणाले.
गोवा राज्य जागतिक पर्यटन स्थळ आहे. पर्यटन क्षेत्रात गोव्याचे नाव अग्रस्थानी आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी अजून संपलेला नाही. तरीही देशांतर्गत पर्यटन सुरू व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम आता सुरू होईल. या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या पर्यटकांनाही लस देण्यात येणार आहे. पण गोंयकारांनी आणि येथे पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे भान ठेवणं आवश्यक आहे. कोरोना कमी होत आहे पण संपलेला नाही हे लक्षात ठेवा. आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.
पंतप्रधान मोदींनी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यांना, विशेषतः गोव्याला पर्यटकांना आमंत्रित करण्याची गरज असल्याचं सांगितलंय. त्यामुळे रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांना परवानगी देण्यासंदर्भात मी त्यांना उद्या पत्र पाठवणार आहे, असं लोबो म्हणालेत.
त्याचप्रमाणे १९ डिसेंबर रोजी आग्वाद किल्ल्याच्या नूतनीकरणाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे, असं लोबो म्हणालेत.