मांद्रे पंचायतीच्या सरपंचपदी सुभाष आसोलकर यांची बिनविरोध निवड

आमदार सोपटेकडून विकास कामांना पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सरपंचांकडून स्पष्ट

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे पंचायतीच्या सरपंचपदी सुभाष आसोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर यांनी सरपंचपदाचा ४ एप्रिल रोजी राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्तच होतं. त्यानंतर मंगळवार ८ रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीत सुभाष आसोलकर यांचा एकमेव अर्ज सरपंचपदासाठी आला.

७ सदस्यांचं समर्थन

यावेळी पंच सदस्य राघोबा गावडे, अश्वेता मांद्रेकर, प्रिया कोनाडकर, सेरेफीना फेर्नांडिस, आंब्रोज फर्नांडिस, महादेव हरमलकर आदींनी त्यांना समर्थन दिल्यामुळे सुभाष आसोलकर यांची बिनविरोध निवड झाली. एकूण पंचायत सदस्यांपैकी त्यांना ७ सदस्यांचं समर्थन लाभलं. यावेळी गट विकास कार्यालयाचे अधिकारी मुरारी वराडकर यांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिलं. त्यांना पंचायत सचिव अविनाश पाळणी यांनी सहकार्य केलं.

हेही वाचाः CORONA UPDATE! खाजगी हॉस्पिटलात अजून 5 मृत्यू झाल्याचं उघड; तर 24 तासांत 473 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

शेडचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजुरीस

दरम्यान नवनिर्वाचित सरपंच आसोलकर यांनी सांगितल, की एका सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याची निवड केली जाते. तीच पद्दत अनुसरून सरपंचपदासाठी आपली बिनविरोध निवड झाली असून पंचायत मंडळांतील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने मांद्रे पांचायत क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. विकासकामांच्या बाबतीत आत्तापर्यंत भेदभाव झाले नाहीत आणि यापुढेही ते होणं नाही. मागील आपल्या प्रभारी सरपंच पदाच्या एका महिन्याच्या कारकिर्दीत ५० लाखांची कामं १४ व्या वित्तआयोगा मार्फत पूर्णत्वास नेली आहेत. तसंच सध्या १० लाख रुपये खर्चून कचऱ्यासाठी शेडचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजुरीस आहे, अशी माहिती आसोलकरांनी दिली.

आतापर्यंत १ कोटी ९ लाखांपैकी ६० टक्के निधी विकास कामांसाठी पंचायतीने वापरला

पंचायत क्षेत्रांतील गटार व्यवस्था सुरळीत करण्याच्या कामाची निविदा पूर्ण झालेली आहे. केवळ कोविड-१९ मुळे लॉकडाऊन असल्याने कामगारांअभावी गटार दुरुस्ती आणि स्वच्छता कामं राहून गेली. लवकरच या सर्व कामांना सुरुवात केली जाणार आहे. तसंच सच्चे भाटले येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी १२० मीटर लांबीच्या गटाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं असून त्याद्वारे रस्त्यावर साचलेलं पाणी ओहोळात सोडण्यात येणार आहे. पंचायतीकडे असलेल्या १ कोटी ९ लाखांपैकी ६० टक्के निधी विकास कामांसाठी पंचायतीने आतांपर्यंत वापरलेला आहे. या विकास कामांसाठी कोणाचेच दुमत नाही, असं आसोलकरांनी सांगितलं.

हेही वाचाः COVAXIN |  कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज

मांद्रे कोविड टास्क फोर्स समिती अत्यंत ऋणी

कोविड-१९ महामारीला सामोरे जाताना मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स यांचा मांद्रे पंचायत क्षेत्रासाठी विलगीकरण कोविड केंद्र उपलब्ध व्हावे असा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला उदरगत संस्थेचे अध्यक्ष व मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी पंचायतीच्या या प्रस्तावाला संमत्ती दर्शवून एक सुसज्ज व सर्व सोयीसुविधा नियुक्त विलीगीकरण कोविड केंद्र उपलब्ध करून दिले. एकूण ७० नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेतला. त्यांच्या या योगदानाबद्दल जीत आरोलकर यांचे मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स समिती अत्यंत ऋणी आहे, असं आसोलकर म्हणाले.

असंच सहकार्य यापुढेही अपेक्षित

मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आतापर्यंत पंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य केलं आहे. विकास कामांत त्यांनी कधी राजकारण आड आणलं नाही. असंच सहकार्य यापुढेही अपेक्षित असल्याचं सरपंच सुभाष आसोलकर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना म्हणाले.

हेही वाचाः 67 मृत्यूंची माहिती लपवलेल्या प्रकाराची चौकशी करा

बऱ्याच नवीन गोष्टी ज्ञात झाल्या

मला सरपंचपदी असताना अनेक अनुभव आले आणि बऱ्याच नवीन गोष्टी ज्ञात झाल्या. आस्कावाडा येथील प्रभागांत पाच विहिरींची दुरुस्ती, पंचायतीच्या नवीन इमारतीची निविदा आणि मांद्रे शिक्षण संस्था आणि राष्ट्रोळी देवस्थानच्या कामाची निविदा मंजुर झाली. तसंच अन्य काही कामं मिळून अंदाजे १५ – १६ लाखांच्या विकास कामांना चालना दिल्याचं अश्वेता मांद्रेकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी सरपंचांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!