विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी | 15 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडणार?

शाळा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्व जारी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : शाळा कधी सुरु होणार याकडे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच येत्या 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. 15 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी विभागाशी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, शाळा आणि खासगी कोचिंग क्लासेस योग्य त्या खबरदारीसह 15 ऑक्टोबरपासून उघडल्या जाऊ शकतील. अंतिम निर्णय हा प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने तfल परिस्थितीनुसार घ्यायचा आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक गरजांनुसार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) राबवू शकतात, असंही केंद्रानं म्हटलंय. प्रत्यक्ष सुरू होणार्‍या शाळांनी एसओपीचे काटेकोर पालन करायचे आहे. ही तत्त्वे दोन भागात दिली आहेत.

आरोग्य सुरक्षितताबाबतची मार्गदर्शक तत्त्वे

१. शाळा सुरू होण्याआधी शाळेची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करून घेणे आवश्यक आहे.

२. हँड वॉश, डिसइन्फेक्शन, बैठकव्यवस्था, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, वेळापत्रक, एन्ट्री-एक्झिट पॉइंट्सची व्यवस्था आदी सर्व प्रकारची व्यवस्था काटेकोर पाळणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष शिक्षण आणि सामाजिक अंतर

1. दोन जणांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर राखणे आवश्यक आहे.
2. विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी वर्गात, प्रयोगशाळेत, खेळाच्या मैदानावर संपूर्ण वेळ मास्क घालणे अत्यावश्यक आहे.
3. विद्यार्थी पालकांच्या लेखी परवानगीनंतरच शाळेत येऊ शकतील.
4. विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीबाबत लवचिकता हवी.
5. विद्यार्थी ऑफलाइन किंवा ऑनलाइन कोणताही पर्याय स्वीकारू शकतील.
6. शाळेतील पोषण आहार बनवताना आणि वाटप करताना अत्यंत काटेकोरपणे आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी.
7. शाळा सुरू झाल्यानंतर किमान 2 ते 3 आठवडे कोणतीही परीक्षा घेऊ नये. परीक्षा घेताना पेन-पेपरऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य द्यावे.

शाळांबाबतचा निर्णय चर्चेअंतीच : मुख्यमंत्री

राज्यातील शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्याध्यापक, पालक-शिक्षक संघटनांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले. 2 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!