दुबईच्या मैदानात बॅटिंग, गोव्याच्या हॉटेलात बेटिंग

15 दिवसांत 6 छापे, 24 जणांना अट, 15 लाखाहून अधिक जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL 2020). सध्या आयपीएलचे सामने दररोज रंगताएत. स्पर्धा चांगल्याच रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. स्पर्धा खेळली जातेय संयुक्त अरब अमिरातीत, परंतु रंगली आहे प्रामुख्याने भारतात. रंगणाऱ्या चुरसपूर्ण सामन्यांबरोबरच आयपीएल स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असते. ते म्हणजे सट्टा खेळण्याचे. ऑनलाईन बेटिंगचा जुगार या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात चालतो. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था भले अडचणीत आलेली असेल, परंतु आयपीएलचा झगमगाट आणि आयपीएलवरील बेटिंग अजिबात कमी झालेले नाही हे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे.

कधी केव्हा कुठे कारवाई?

1 कांदोळी 30 सप्टेंबर, 1.50 लाखाचा मुद्देमाल जप्त
2 मोरजी-पेडणे 1 ऑक्टोबर, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त
3 कांदोळी – मॅग्नम रिसोर्ट, 1 लाखाचा ऐवज जप्त
4 बागा – अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
5 करंझाळे – एका फ्लॅटवर छापा, शनिवार 10 ऑक्टोबर, 2 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त
6 कांदोळी – 12 ऑक्टोबर, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

हॉटेलमध्ये बेटिंग जोमात

ही स्पर्धा सुरू झाल्यापासून गोव्यात पोलिसांनी आतापर्यंत ६ ठिकाणी छापे मारून ऑनलाईन सट्टाबाजार उधळून लावला आहे. प्रामुख्याने मोरजी, बागा, कळंगुट, कांदोळी या समुद्रकिनाऱ्यांच्या पट्ट्यात हॉटेलांमधून ऑनलाईन बेटिंगची रॅकेट चालू असतात. तिकडे मैदानावर खेळ चालू असताना हॉटेलच्या खोलीत बसून या वेगळ्या खेळाचे आयोजक अॉनलाईन बेटिंग चालवतात. त्यात सहभागी होण्यासाठी हॉटेलमध्ये येऊन राहणारे पर्यटक असतात, त्याचप्रमाणे इतर ठिकाणांहून या खेळात सहभागी होणारे उत्साही जुगारीही असतात. एकेका सामन्यावर लाखो रुपयांचे बेटिंग चालते. पैसा लावणारे बहुतेक त्यात हरतात, एखाद दुसरा जिंकतही असेल. परंतु मॅन ऑफ द मॅच असतो सट्ट्याचा संचालक.

गेल्या अकरा दिवसांत पोलिसांनी कांदोळीत दोन वेळा, मोरजी येथे एकदा तर गेल्या शनिवारी बागा-कळंगुट येथे छापा मारून बे​टिंगचा खेळ रंगेहाथ पकडला. लाखो रुपयांची रोख रक्कम, ऑनलाईन बेटिंगचे साहित्य आणि उपकरणे जप्त केली. चारही छाप्यांमध्ये मिळून पंधरा ते सतरा लाेकांना अटक केली, यात खेळाचे आयोजक आहेत, तसेच खेळताना पोलिसांच्या तावडीत सापडलेले पर्यटकही आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे छापे मारून अटक केलेल्या आयोजक आणि जुगाऱ्यांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत बातमी प्रसिद्ध होण्याआधी रातोरात जामीन मिळालेला असतो. कारण म्हणे जुगार हा जामीनपात्र गुन्हा आहे आणि संशयितांना कोठडीत डांबून ठेवता येत नाही!

हेही वाचा – गोयकर सुपुत्राची कमाल, आयपीएलमध्ये बजावतो महत्त्वाचा रोल

कुणाच्या आशीर्वादाने बेटिंग?

करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता शिथील झाला आहे, वाहतुकीवरील निर्बंध उठले असले तरी सामाजिक अंतराचे पालन अनिवार्य आहे. मात्र सुरक्षेचे सर्व उपाय भिरकावून देत, जुगार प्रतिबंधक नियमांचा भंग करीत ऑनलाईन सट्टा चालतो. संघांवर, खेळाडूंवर हजारो रुपयांच्या बोली लावल्या जातात. कारवाई मात्र तोंडदेखली असते. कडक कारवाईची भीतीच नसल्यामुळे हे चालते. असे असेल तर हतबल बनलेले पोलिस खाते जुगारविषयक कायदे आणि नियम कडक करण्याची शिफारस सरकारला का बरे करीत नाहीत? सरकार स्वत:हून हे कायदे कडक करण्याचे पाऊल का बरे उचलत नाही? की आज आयपीएलच्या निमित्ताने तर उद्या आणखी काही तरी निमित्ताने, सर्वांच्याच फायद्याचा हा खेळ रंगलेला असतो? दर काही दिवसांनी पोलिसांनी छापे मारून कारवाई केल्याचे दाखविले तरी स्पर्धा संपेपर्यंत हे जुगारी अड्डे चालू राहतील याबाबत सर्वसामान्य माणसाला अजिबात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!