ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि ‘हिमालयाचे रक्षक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी निधन झालं. कोरोना संसर्गामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सुंदरलाल बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बहुगुणा हे 94 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर उतराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

चिपको चळवळीचे प्रणेते
सुंदरलाल बहुगुणा हे महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत होते. त्यांनी आयुष्यभर गांधीवादाचा अंगिकार केला. त्यांच्या आंदोलनातून वेळावेळी गांधीवाद डोकवायचा. 70च्या दशकात त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ सुरू केली होती. देशभर या चळवळीचा परिणाम झाला. याच काळात त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची जगानेही दखल घेतली होती. वृक्षतोडीविरोधातील हे आंदोलन होतं. मार्च 1974मध्ये शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं.
Chipko movement leader Sundarlal Bahuguna died of COVID19 at AIIMS, Rishikesh today, says AIIMS Rishikesh Administration
— ANI (@ANI) May 21, 2021
(File photo) pic.twitter.com/6QQGf0vYm5
हिमालयाचे रक्षक
उत्तराखंडच्या टिहरी येथे 9 जानेवारी 1927 रोजी बहुगुणा यांचा जन्म झाला होता. त्यांनी केवळ पर्यावरणावरच नाही तर अस्पृश्यतेविरोधातही आंदोलन केलं. त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. गांधीजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘हिमालय बचाव’चे काम सुरू केलं. आयुष्यभर त्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांना ‘हिमालय रक्षक’ म्हणूनही संबोधलं जातं. 1980मध्येच त्यांनी टिहरी धरणविरोधी चळवळही सुरू केली होती. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1980मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2009मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहुगुणा यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करताना म्हटलंय, सुंदरलाल बहुगुणा जी यांचं निधन म्हणजे आपल्या देशाचं मोठं नुकसान आहे. निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्याचं आपले शतकानुशतके जुने विचार त्यांनी समाजात कायम रुजवले. त्यांचा साधेपणा आणि करुणेची भावना कधीही विसरता येणार नाही. माझी सहानुभूती त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि त्यांच्या चाहत्यांसोबत आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती.
Passing away of Shri Sunderlal Bahuguna Ji is a monumental loss for our nation. He manifested our centuries old ethos of living in harmony with nature. His simplicity and spirit of compassion will never be forgotten. My thoughts are with his family and many admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2021