‘नेटवर्क नसल्याची बातमी करता, टॉवरला विरोध करणाऱ्यांचीही बातमी करा’

कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर यंदाही सुरु झालेल्या ऑनलाईन शाळेतील अडथळ्यांवरुन सरकारवर अनेकांनी टीका केली होती. प्रामुख्यानं ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत ही समस्या सोडवण्यासाठी टॉवर उभारण्याचा कामाला वेग आणण्याचे प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तसंच त्यासाठीची प्रक्रियाही अधिक सुलभ करण्यासाठीचे निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेटवर्क कनेक्टीव्हीच्या समस्येला मोबाईल टॉवरला विरोध करणारेही तितकेच जबाबदार असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

लोकांनी अनेकदा टॉवर घालण्यासाठी अडथळे आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. याआधीही जेव्हाजेव्हा गावांगावांत मोबाईल टॉवर घालण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा गावातील लोकांनी टॉवरला विरोध केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. याबाबत रितसर तक्रारी आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. बातमी करताना आपण थेट टॉवर नाही म्हणून केली जाते. ज्यांनी टॉवरला विरोध केलेला, त्यांची बातमी केली जात नाही. त्याचीही बातमी पत्रकारांनी करावी. जेणेकरुन लोक टॉवरला विरोध करत असल्याचं इतरांना कळेल. आतापर्यंत ७० ते ८० तक्रारी टॉवरबाबत आलेल्या आहेत. टॉवर घालायला गेलेल्यांना अडवल्यांनी विरोध सोडून सहकार्य करण्याची गरज यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ

ग्रामीण भागात जिथं जिथं नेटवर्कची समस्या आहे, तिथे लवकराच लवकरच टॉवर उभे करुन ही समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यासाठी काही ग्रामीण भागांचा अभ्यासही करण्यात आला असून तिथं तातडीनं टॉवरच्या कामाला सुरुवातही केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. किती टॉवर बांधले जाणार आहे, त्याची आकडेवारी सध्या जरी नसली तरी गरजेप्रमाणे टॉवर बांधले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : Video | Dilip Kumar is no more | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

गोवन वार्ता लाईव्हचा दणका

सांगेतील कार्ला गावावर केलेल्या गोवनवार्ता लाईव्हच्या स्पेशल रिपोर्टनंतर राज्यातील अशी अनेक गावं समोर आली. नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांचे काय हाल होत आहेत, याच्या बातम्या गोवनवार्ता लाईव्हने सातत्यानं लावून धरल्या होत्या. फक्त सांगेतच नव्हे तर सत्तरीतीलही अनेक गावांत नेटवर्कमुळे ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आता टॉवर उभारण्यासाठी सुलभ प्रक्रिया करण्यात येत असली, तर नेटवर्क आणि कनेक्टिव्हीटीचा प्रश्न सुटतो का, हेही पाहणं महत्त्वाचंय. कारण काही दिवसांपूर्वीच टॉवर असूनही नेटवर्क नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. अशातच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ग्रामीण भागातील जनता आता टॉवर उभारणीसाठी कसं सहकार्य करते, हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ –

कॅबिनेट बैठकीत आणखी कोणते निर्णय झाले?

कोविडमुळे फटका बसलेल्या २५ ते ३० हजार पारंपारिक व्यवसायिकांना एक रकमी ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य

ग्रामीण भागात सरकारी जागेतील मोबाईल टॉवरना पहिल्या ५ वर्षांसाठी भाडे कपात. सरकारी जागेत १४४ टॉवरसाठी अर्ज

३० ऑक्टोबरपर्यंत गोव्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय

हेही वाचा : ACCIDENT | नुवे-सासष्टी येथे दुर्दैवी अपघात; एकाचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!