राऊतांची तोफ धडाडली… सीमालढ्याची मशाल पुन्हा पेटली..!

सीमाप्रश्नासाठी राऊतांनी थेट मोदी-शहांना ललकारलं!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: ‘बऱ्याच वर्षांनी बेळगावात वाघ, सिंहाचा खेळ सुरू झालाय, त्यामुळं आता माकडांचं काम नाही’, अशी खास शिवसेना स्टाईलनं आपल्या भाषणाची सुरुवात करत शिवसेनेचे उपनेते, खासदार संजय राऊत यांनी सीमाभागातल्या मराठी बांधवांची मनं जिंकली. निमित्त लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराचं असलं तरी त्यांचं भाषण सीमाप्रश्नावरंच होतं. आपल्या भाषणात सीमाबांधवांच्या ऐक्याला भाजपनंच सुरूंग लावल्याचा घणाघात त्यांनी केला. इतकंच नव्हे, तर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी थेट मोदी-शहांना ललकारलं. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीतील उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहेत. प्रचारसभेच्या आधी भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेला मराठी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. संयुक्त महाराष्ट्र चौकात झालेल्या या सभेत खासदार धैर्यशील माने यांच्यासह मोठ्या संख्येनं सीमाप्रश्न लढ्यातली नेतेमंडळी उपस्थित होती.

हेही वाचाः वाळपई रेडेघाटीमध्ये विचित्र अपघात, गॅस सिलिंडरची गाडी उलटली

सीमावासीयांच्या ऐक्याला भाजपनं सुरूंग लावला!

सीमावासियांचा हा लढा सर्वांत मोठा संघर्ष असल्याचं सांगत राऊत यांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सीमावासीयांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कटीबद्ध असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या या लढयाला सुरूंग लावण्याचं काम भाजपनं केल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. एका मराठी माणसाला पाडण्यासाठी गडकरींसारखे मराठी नेते बेळगावात येताहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. अशांचा निषेध करायला हवा, असंही त्यांनी सांगितल.

हेही वाचाः पेडणेतील ट्रकवाल्यांचं आंदोलन अखेर मागे

पश्चिम बंगालबरोबर बेळगावातलाही अन्याय पहा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये आहेत. तिथल्या ममता बॅनर्जी या अन्याय करतात म्हणून त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी ते तिथं जाताहेत. परंतु त्यांनी बेळगावातही यावं, आणि इथं जो सीमावासीयांवर अन्याय होतोय, तोही पहावा, असंही राउत म्हणाले. माझं कर्नाटक सरकारशी अजिबात भांडण नसल्याचं सांगत ते म्हणाले, कर्नाटक सरकारच्या हातात काहीच नाही. त्यांचं मुख्यमंत्रीपदही केंद्र ठरवतं. परंतु काश्मिरमधल्या 370 कलमाच्या चुकीची दुरूस्ती तुम्ही केलीत, तर मग आमचा सीमाप्रश्नही केंद्रानं सोडवायला हवा, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः नितेश राणेंनी यासाठी केलं गोव्याच्या ‘सीएम’चं कौतुक!

आम्ही एक आहोत, तुम्ही फुटू नका !

सीमाबांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्याचं सांगत राउत म्हणाले, मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारची कोंडी करायची तर ती आम्ही कधीही करू शकतो. पाणीसुद्धा बंद करू शकतो. मात्र माणुसकीच्या भावनेतुन आम्ही हे करत नाही. शिवसेना आणि सर्व सहकारी पक्ष या लढ्यात आपल्या सोबत आहेत. अखेरपर्यंत सोबत राहतील. आम्ही एकच आहोत, मात्र तुम्ही फुटू नका, असं आवाहन राऊत यांनी यावेळी सीमाबांधवांना केलं.

हेही वाचाः Board EXAMS | सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सीमालढ्याची मशाल पुन्हा पेटली..!

दरम्यान, या लोकसभा पोटनिवडणूकीच्या निमित्तानं प्रचारात तरी सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. खासदार संजय राऊत यांनी अनेक विषयांना पुन्हा तोंड फोडलंय. काश्मिरातल्या 370 कलमाचं आणि पश्चिम बंगालमधल्या मिशनचा उल्लेख करत सीमाप्रश्न सोडवण्याबाबत थेट मोदी शहांना ललकारलंय. पण हा केवळ निवडणूकीपुरता स्टंट आहे की खरंच या प्रश्नासंदर्भात शिवसेना प्रत्यक्ष काही करणार, याबाबत अजुनही प्रश्नचिन्ह आहे. कारण भाजपसोबत यापूर्वी अनेकदा युतीसरकारमध्ये सहभागी असुनही यासंदर्भात काहीच तोडगा निघाला नाही, हा इतिहास आहे. संजय राऊत यांच्या भाषणामुळं सीमाबांधवांच्या लढ्याची मशाल पुन्हा एकदा पेटली आहे. मात्र त्यांची ही डरकाळी खरंच हा प्रश्न सोडवण्यासाठी ताकद देणार की हवेतच विरून जाणार, हेही काही दिवसात स्पष्ट होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!