श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या नुतनीकरणाने गोमंतकातील मराठा साम्राज्याला नवा उजाळा

ऋषभ | प्रतिनिधी

पणजीः गोमंतकांत मराठा साम्राज्य होते की नाही, यावरून मागील काही दिवसांत बराच वाद रंगला होता. या विषयावरून वाद- प्रतिवादही रंगले परंतु पोर्तुगीज काळात सुरू असलेल्या बाटवा-बाटवीला चोख प्रत्यूत्तर देण्याकरिता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केल्याचे अनेक एतिहासिक पुरावे आणि दस्तएवज पुरातत्व खात्याकडे उपलब्ध आहेत. गोव्यावरील मराठा साम्राज्याचे एक ज्वलंत प्रतिक म्हणून डिचोली तालुक्यातील नार्वे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुर्ननिर्माण केलेले श्री सप्टकोटेश्वर मंदिर म्हणावे लागेल. या पुरातन आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या मंदिराचे अलिकडेच गोवा राज्याच्या पुरातत्व खात्याने नुतनीकरण आणि सुशोभीकरण केले आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा गोमंतकावरील मराठा साम्राज्याच्या इतिहासावर नव्याने लख्ख प्रकाश पडणार आहे.
इतिहास साक्षी आहे…

पोर्तुगीजांनी गोव्यात पहिल्यांदा पाय ठेवले ते तिसवाडीत. या तालुक्याचा जुन्या काबीजादीत समावेश होतो. ह्याच जुन्या काबीजातीत दिवाडी बेटाचा समावेश होतो. ह्याच दिवाडी बेटावर श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर होते,असा उल्लेख इतिहासात सापडतो. पोर्तुगीजांनी गोव्यावर धर्मांतराचा वरवंटा फिरवल्यावर त्यांनी शेकडो मंदिरांची नासधुस केली. ह्यातच दिवाडी बेटावरील श्री सप्तकोटेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. एवढेच नव्हे तर या मंदिरातील पवित्र लिंग एका विहीरीच्या पायथ्यावर ठेवण्यात आले जेणेकरून विहीरीत पाणी काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने या शिवलिंगावर पाय ठेवूनच पाणी काढावे,अशी विकृत मानसिकता पोर्तुगीज राज्यकर्त्यांची होती.

श्री सप्तकोटेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज उर्फ उदय सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार १९३४ साली जयवंत विनायक सूर्यराव सरदेसाई यांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहासावर एक पुस्तक लिहीले. या पुस्तकात या घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. श्री सप्तकोटेश्वर हे सरदेसाई कुटुंबियांचे कुलदैवत. कैक हजारो वर्षांपूर्वी एका सिद्ध पुरूषाने भगवान महादेवाची तपश्चर्या केली. त्याची ती भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पंचगंगेच्या तिरी म्हणजेच आत्ताचे दिवाडी बेट इथे सप्तकोटेश्वर अवतरले. ७ कोटी वर्षे तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न झाल्यामुळे त्यांना सप्तकोटीश्वर
म्हणण्यात आले आणि कालांतराने त्याचे नाव सप्तकोटेश्वर झाले.
नारायण सुर्यराव सरदेसाईंना झाला दृष्टांत

कदंब काळात दिवाडी येथे श्री सप्तकोटेश्वराची स्थापना झाली होती. हा गोव्याच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. कदंब राज्यकर्त्यांचे हे कुलदैवत. कदंब काळानंतर गोव्यावर आदिलशाही राजवट प्रस्थापित झाली. यावेळी आदिलशाही आणि विजयनगर यांच्यात सातत्याने संघर्ष सुरूच होता. यानंतर पोर्तुगीजांनी गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारावर भर देऊन इथल्या हिंदु लोकांवर अनन्वीत अत्याचार आणि जुलूम केले. मंदिरांची नासधुस सुरू केली. हिंदुवरील या अत्याचाराची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचल्यानेच त्यांनी गोव्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. ह्याच दरम्यान, श्री सप्तकोटेश्वराच्या पवित्र लिंगाची अवहेलना सुरू असल्याचा दृष्टांत नारायणराव सूर्यराव सरदेसाई यांना झाला आणि त्यांनी ते लिंग डिचोली तालुक्यातील नार्वे गावांत आणून सुरक्षीत ठेवले. या लिंगाच्या सभोवताली झावळ्यांचे झुडूप घालून ते सुरक्षीत राहील, याची दक्षता घेतली. डिचोली तालुका हा नव्या काबिजादीपैकी असल्याने तिथे पोर्तुगीजांचा अधिक वावर नव्हता आणि त्यामुळे या लिंगाला सरंक्षण मिळाले.
छत्रपतीं शिवाजी महाराजांकडून जिर्णोद्धार


दरम्यान, पोर्तुगिजांनी चालवलेल्या धर्मच्छलाविरोधात कारवाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली. ह्या काळात ते डिचोली प्रांतात होते आणि त्यावेळी त्यांना शिवलिंगाभिषेक करण्याची इच्छा प्रकट झाल्यानंतर नारायणराव सुर्यराव सरदेसाई यांनी त्यांना श्री सप्तकोटेश्वराच्या पवित्र लिंगाची माहिती दिली. ही माहिती मिळताच छत्रपतींनी तिथे धाव घेत ह्या लिंगाची पाहणी केली आणि पहिल्यांदा या लिंगावर अभिषेक केला. ह्याच दरम्यान, त्यांनी 1668 साली नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुर्नबांधणीची प्रक्रिया सुरू केली.
नुतनीकरणावेळी आश्चर्यांचे दर्शन







या ऐतिहासिक ठेवा असलेल्या मंदिराच्या नुतनीकरणावेळी अनेक आश्चर्याच्या गोष्टींचा उलगडा झाला. मंदिराच्या समोर सापडलेला एक भूयारी मार्ग, मंदिराच्या उजव्या हाताला असलेली विहीर तसेच गर्भकुडीच्या माथ्यावर असलेला गुप्त सभागृह, मंदिराची गर्भकुड ही एकाच विशाल दगडात कोरलेली पाहायला मिळाली. पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे काम करताना याकडे विशेष लक्ष दिले आहे. या पुरातन खुणा जपल्या जातील याची काळजी घेतली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक संस्कृत शिलालेख देखील आहे.
पुरातत्व खात्यासमोर आव्हान

या पुरातन आणि एतिहासिक मंदिराचे नुतनीकरण करताना त्याचा मुळ ढाचा आणि पुरातन गोष्टींचे जतन करण्याचे मोठे आव्हान या खात्यासमोर होते. ते या खात्याने लिलया पेलले. मंदिराचे बांधकाम करताना कुठल्याच प्रकारच्या सिमेंटचा वापर न करता जुन्या काळात वापरण्यात येणारी पद्धत वापरात आणलेली आहे. मंदिरासमोर असलेल्या तळीला देखील एक वैशिष्ट्य आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या तळीचे पाणी औषधी आहे. या तळीत आंघोळ केल्याने त्वचारोग बरा होतो असेही गांवकऱ्यांचे म्हणणे आहे. मंदिरातील कावी कलेच्या खुणा तशाच जपण्यात आलेल्या आहेत.


अध्यात्मिक पर्यटनाचे बनावे केंद्र
नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर हे गोव्याच्या अध्यात्मिक पर्यटनाचे एक महत्वाचे केंद्र ठरावे, अशी इच्छा या देवस्थान समितीने व्यक्त केली आहे. एक जागृत आणि एतिहासिक महत्व असलेल्या या मंदिराकडे मोठ्या प्रमाणात इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी तथा संशोधनप्रेमी पर्यटकानी भेट देऊन या स्थानाची किर्ती जगासमोर पोहचवावी जेणेकरून या इतिहासाचा प्रचार होऊन हे केंद्र मुख्य आकर्षण ठरू शकते,असेही मत त्यांनी व्यक्त केले.
संदर्भ: IMAGES TAKEN FOR REFFRENCE FROM https://www.vaastuvidhaan.in/Shri-Saptakoteshwar-Temple.html