म्हापसा-खोर्लीचा सुपुत्र IPLमध्ये अंपायर

यशवंत बर्डे मैदानी अंपायर व थर्ड अंपायर म्हणून देत आहेत योगदान. इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत अंपायर बनलेले यशवंत बर्डे एकमेव गोमंतकीय अंपायर.

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत अंपायरची जबाबदारी पार पाडणं, हे सर्व पंचांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. आणि हे आव्हान सलग दुसर्‍या वर्षी पेललंय ते खोर्ली-म्हापसा इथल्या यशवंत बर्डे (Yeshwant Barde) यांनी. सध्या दुबईत सुरू असलेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल 2020 (IPL) स्पर्धेत ते अंपायर म्हणून काम पाहत आहेत.

इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत अंपायर बनलेले यशवंत बर्डे हे गोव्यातील एकमेव अंपायर आहेत. 47 वर्षीय यशवंत बर्डे यांनी गेल्या वर्षीही आयपीएलसाठी योगदान दिलं. यावेळीही ते मैदानी अंपायर व थर्ड अंपायर म्हणून योगदान देत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर अंपायर म्हणून जबाबदारी सोपविली.

यशवंत बर्डे यांची क्रिकेट कारकीर्द
1993-94 मध्ये ऑलराऊंडर म्हणून गोव्याच्या रणजी संघात बर्डे यांनी प्रवेश केला. 2005 मध्ये ते निवृत्त झाले. या काळात 19 रणजी सामन्यांमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केलं. ऑलराऊंडर म्हणून ते परिचित होते. रणजीमध्ये त्यांनी 69 ही सर्वोकृष्ट धावसंख्या नोंदविली, तर एकदिवसीय सामन्यात हैदराबाद विरुद्ध 98 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. 2006 मध्ये पंचाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंच म्हणून खेळाडूंना बढती देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तीर्ण झालेल्या पंचांची तीन वर्षांसाठी रणजी सामन्यांचे पंच म्हणून निवड केली होती. मात्र बर्डे यांनी प्रथम 25 वर्षांखालील एकदिवशीय सामन्यांची अंपायरींग केली. 2007 मध्ये तामीळनाडू विरुद्ध हैदराबाद संघादरम्यान हा सामना झाला होता. या सामन्यात त्यांच्यासोबत गोव्यातील भारत नाईक यांनी अंपायरींग केली होती.

राजा नागराजन पहिले गोमंतकीय पंच
15 वर्षांपूर्वी गोव्यातील राजा नागराजन हे पंच बनले. ते मूळ तामिळनाडूचे. मात्र गोव्यात स्थायिक झाले होते. त्यानंतर भारत नाईक व नितीन पै हे पंच बनले. नंतर यशवंत बर्डे आणि खलीद सय्यद बीसीसीआयचे पंच बनले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!