धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा सापडला

श्रीलंका संघाच्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४९ व्या षटकात त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने मारलेला सिक्सर वर्ल्डकप जिंकून देणारा ठरला.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) 2011 च्या विश्वचषकात वानखेडे स्टेडियमध्ये मारलेला ऐतिहासिक षटकार ‘माही’चे चाहते विसरणार नाहीत. ‘कॅप्टन कूल’चा तो ‘वर्ल्डकप विनिंग’ षटकार झेललेल्या क्रिकेट रसिकाचा तब्बल नऊ वर्षांनी शोध लागला. याचं श्रेय जातं भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना.
तो दिवस होता 2 एप्रिल 2011. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होता. श्रीलंका संघाच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 49 व्या षटकात त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने मारलेला सिक्सर सामना आणि पर्यायाने वर्ल्डकप जिंकून देणारा ठरला.
धोनीच्या सिक्सरनंतर देशभरात एकच जल्लोष झाला आणि तो चेंडू षटकार झेलणाऱ्या चाहत्यासाठी स्पेशल गिफ्ट ठरला. वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हिलियन L ब्लॉकमधील सीट क्रमांक 210 ही ती जागा.
धोनीने षटकार ज्या जागेवर मारला ते आसन कायमस्वरुपी धोनीच्या नावाने ओळखले जाईल, अशा पद्धतीने सुशोभित करण्यात यावे, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अजिंक्य नाईक यांनी केली होती. तसंच तो ऐतिहासिक चेंडू जतन करावा, असेही अजिंक्य नाईक यांनी सुचवले होते. धोनीने 15 ऑगस्टला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीचा यथोचित सन्मान करण्यासाठी अजिंक्य नाईक यांनी हा प्रस्ताव एमसीए कमिटीच्या बैठकीत मांडला होता.
नाईक यांनी मांडलेली संकल्पना सुनील गावस्कर यांना आवडली होती. ऐतिहासिक षटकाराचा चेंडू जिथे पडला, ती जागा आणि तो चेंडू शोधण्यासाठी सुनील गावस्कर यांनी पुढाकार घेतला. ऐतिहासिक षटकार झेलणारा हा क्रिकेट रसिक सुनील गावस्कर यांच्या ओळखीचा आहे. सध्या हाँगकाँगमध्ये निवासी असलेल्या या रसिकाकडेच तो चेंडू आहे. ऐतिहासिक षटकाराची ती जागा नेमकी कोणती आहे तसंच तो क्रिकेट रसिक आपल्या ओळखीचा असल्याचे गावस्कर यांनी अजिंक्य नाईक यांना अलीकडेच एका ईमेलद्वारे कळवले आहे. एमसीएची अपेक्स कौन्सिल आणि म्युझियम कमिटी याबाबत पुढील पाठपुरावा करणार आहे. एमसीएमध्ये विश्वचषक सामन्याच्या आठवणी जपणारे म्युझियम शोकेस असेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने आधीच स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!