विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर ‘या’ दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी

कर्णधार पदाची जबाबदारी उपकर्णधार रोहित शर्माला मिळेल अशी चर्चा; तर जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना उपकर्णधार बनण्याची संधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: भारताचा कर्णधार विराट कोहली याने 16 सप्टेंबर रोजी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणार केली. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, टी -20 विश्वचषकानंतर यापुढे तो टी -20 संघाचा कर्णधार राहणार नाही. टी -20 संघाचा कर्णधार म्हणून त्याची ही शेवटची स्पर्धा असेल. तथापि, तो टी -20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत राहील. दरम्यान त्याच्या या निर्णयानंतर आता कर्णधारपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशावेळी शक्यतो ही जबाबदारी उपकर्णधार रोहित शर्माला मिळेल अशी चर्चा असून त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक चषकही जिंकले आहेत.

दरम्यान विराटच्या जागी रोहितला जागा मिळाल्यास रोहितच्या जागी अर्थात उपकर्णधारपदासाठीही नवा चेहरा दिसणार असून ही संधीही रोहित प्रमाणे मुंबई इंडियन्स संघाच्याच खेळाडूला मिळण्याची शक्यता आहे. हा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहसह  केएल राहुल आणि ऋषभ पंत या युवा खेळाडूंनाही उपकर्णधार बनण्याची संधी आहे.

खेळावर निवडणार उपकर्णधार

विराट कोहली हा इंग्लंड दौऱ्यानंतर टी20 सामन्यांमध्ये सलामीसला येऊ शकतो. त्याने आयपीएलमध्ये सलामीवीराची भूमिका निभावली आहे. सध्या केएल राहुलची संघातील जागा पक्की नसल्याने  विराटला ओपनिंग करावी लागू शकते. दरम्यान अलीकडे पंतचे टी-20 प्रदर्शन खास नसल्याने त्याच्या जागी बुमराहलाच उपकर्णधार म्हणून संधी मिळू शकते.

विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार.

वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसेच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देणं गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही फलंदाज म्हणून देत राहीन.

अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित शर्मा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!