….आणि विराट कोहली म्हणाला, ‘तुला परत मानला रे ठाकूर’!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात सध्या कसोटी मालिका खेळतेय. शेवटची आणि चौथी निर्णायक कसोटी रंगतदार स्थितीत आली आहे. पहिले दोन दिवस भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या दिवशी फलंदाजांची दाणादाण उडेल असं वाटत असतानाच भारताच्या दोन युवा खेळाडूंनी डाव सावरला. वॉशिंगटन सुंदर आणि शार्दुल ठाकूरनं विक्रमी भागीदारी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. त्यांच्या या खेळीवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीही खूश झाला आणि त्यानं चक्क मराठीत शार्दुल ठाकूरचं कौतुक केलंय. तुला परत मानला रे ठाकूर असं म्हणत त्यांनी या दोघांच्याही खेळीवर स्तुतीसुमनं उधळलीत.

वाचा विराट कोहलीचं ट्वीट..
Outstanding application and belief by @Sundarwashi5 and @imShard. This is what test cricket is all about. Washy top composure on debut and tula parat maanla re Thakur! 👏👌
— Virat Kohli (@imVkohli) January 17, 2021
चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी जबरदस्त खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचंय.
पाहा ‘सुंदर’ ड्राईव्ह
A no-look six 👀#AUSvIND pic.twitter.com/S5xsJ0aH9k
— ICC (@ICC) January 17, 2021
186 धावांवर भारताचे आघाडीचे सहा फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर भारतीय संघ 200 धावांपर्यंत तरी पोहोचेल का? अशी शंका घेतली जात होती. मात्र, पदार्पण करणारा सुंदर आणि दुसरा सामना खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरनं डाव सावरला. या दोघांनीही जबाबदारीनं फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडनं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.