आयपीएलसाठी स्टेडियममध्ये होणार प्रेक्षकांचा जल्लोष

बीसीसीआयची घोषणा : उद्यापासून तिकीट विक्री सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामाच्या स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या रविवार १९ तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. हा टप्पा सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. यापूर्वी करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्यांचे आवडते खेळाडू तसेच टीमला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट केले असून त्यामध्ये फॅन्सना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देणार असल्याचे म्हटले आहे.

आजपासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करता येणार

क्रिकेट फॅन्स गुरुवार, दि. १६ सप्टेंबरपासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करू शकणार आहेत. आयपीएलच्या www.iplt20.com या अधिकृत वेबसाईटवरून प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील.

कोविड प्रोटोकॉल, यूएई सरकारचे नियम पाळण्याची खबरदारी

दरम्यान, स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारचे नियम पाळण्याची खबरदारी घ्यावी लागेल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने दुबई, शारजाह आणि अबूधाबी या शहरांमध्ये होणार आहेत. यापूर्वी भारतामध्ये या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला. त्यावेळी २९ सामन्यांनंतर आयपीएलच्या बायो-बबलमध्ये करोनाचा उद्रेक झाल्याने ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये होणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने १९ रोजी दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

२०१९ नंतर प्रथमच आयपीएल प्रेक्षकांसमोर खेळली जाणार

२०१९ नंतर प्रथमच आयपीएल प्रेक्षकांसमोर खेळली जाईल. गतवर्षी आयपीएल अमिरातमध्ये बंद दारामागे खेळली गेली होती, तर २०२१ मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा कठोर बायो-बबलमध्ये खेळला गेला होता. नेमकी किती प्रेक्षक संख्या असेल हे लीग आयोजकांनी स्पष्ट केले नसले तरी सूत्रांनी सांगितले की, प्रेक्षकांची उपस्थिती स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के असेल. उर्वरित आयपीएलसाठी प्रेक्षक १६ सप्टेंबरपासून तिकीट खरेदी करू शकतात. या दरम्यान, कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमांचे पालन केले जाईल.

कोविड लस घेतल्यास पाहता येणार सामने

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा १९ रोजी सुरू होत असून स्टेडियममधून सामना पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारचे नियम पाळण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार क्रिकेटप्रेमींना करोना लस घ्यावी लागणार आहे. यूएई सरकारने भारतासह १५ देशांवरील आपल्या देशातील ट्रॅव्हल बॅन हटवला आहे. आता या देशातील नागरिकांना यूएईमध्ये जाता येणार आहे. पण, त्यासाठी जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्युएचओ)ने मंजुरी दिलेली लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना जर यूएईमध्ये जाऊन प्रत्यक्षात आयपीएलचा सामना पाहायचा असेल तर त्यांना कोविशिल्डचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे.

कोणता संघ गुणतालिकेत अव्वल

आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुणतालिकेचा विचार करता रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने ८ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्सने ७ पैकी ५ सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ १० गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्स (८), राजस्थान रॉयल्स (६), पंजाब किंग्स (६), कोलकाता नाइट रायडर्स (४) आणि सनरायझर्स हैदराबाद (२) हे संघ अनुक्रने चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत.

हा व्हिडिओ पहाः Accident | Bullet | बुलेटचा अपघात, 30 तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!