Video | नीरजच्या आयुष्यातील ते ७ सेकंद!

नीरजनं केली कमाल!

Goan Varta Live | प्रतिनिधी

सोशल मीडियावर नीरज चोप्राच्या कामगिरीचं प्रचंड कौतुक होतंय. अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. त्याबद्दलच्या या काही मोजक्या आणि लक्षवेधी फेसबूक पोस्ट..

ओंकार दाभाडकर लिहितात की,

हा व्हिडीओ बघा. त्यातला नीरजचा गोल्डन थ्रो नीट बघा.आणि लक्षात घ्या – नीरजचं हे यश डोळे दिपवणारं आहेच – पण त्याहून अधिक डोळे उघडणारं आहे.आज, वयाच्या २४ व्या वर्षी नीरजने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, कृतज्ञ वाटेल असा तीर मारला आहे. भारतीय सरकारने त्याला ७५ लाखांचं तर हरियाणा सरकारने ६ कोटींचं बक्षीस घोषित केलंय.कृतार्थ झाला आज नीरज.हे सगळं डोळे दिपवणारंच.पण हा व्हिडीओ बघितलात ना?काही जाणवलं का त्यात?

नीरजच्या थ्रोची, मला जाणवलेली सर्वात भेदक गोष्ट म्हणजे – ७ सेकंदांचं ड्युरेशन.बस्स…७ सेकंद…!नीरजच्या भाल्याने लँड होण्यात काही मीटर्सचा फरक केला असता तर – निष्कर्ष थेट पॉझिटिव्ह इन्फिनिटीच्या ऐवजी निगेटिव्ह इन्फिनिटीत फेकला गेला असता.त्याची जन्मभराची तपश्चर्या आज ७ सेकंदांत सुफळ वा थेट विफल होणार होती.आजपर्यंत नीरजने टप्प्या टप्प्याने अनेक यश मिळवले आहेत. कॉमन वेल्थ गेम्स, एशियन गेम्स, वर्ल्ड अंडर ट्वेन्टी चॅम्पियन…एकेक गड सर करत नीरज टोकियो ऑलिंपिक्स २०२०त पोहोचला होता.आज जराशी चूक – आणि इथवर येऊन काय साधलं – असं होऊन गेलं असतं…! काही क्षणांसाठी का असेना, नीरज – नीरजचे समर्थक, कोच, कुटुंबीय..आणि अख्खा देश नाराज असला असता. अर्थात, त्याने आजपर्यंत साध्य झालेलं, सर केलेलं सर्व निकालात निघणार नव्हतंच.

पण सर्वोच्च बिंदूचं महत्व वेगळं असतंच…नाही का?७ सेकंद…!७ सेकंदांत ते महत्व ठरणार होतं…!म्हणूनच नीरजचा भाला आपले डोळे उघडणारा आहे.प्रत्येक क्षण, दररोज, कित्येक महिने…वर्षं…अथक मेहनत घेतल्यानंतर – “त्या काही क्षणांत” काय घडतं…यावर आपली डेस्टिनी ठरते.एमबीए एन्ट्रान्ससाठी १-२-३ वर्षं मेहनत घेऊन ऐन परीक्षेच्या दिवशी काही गडबड झाली तर?!स्वतःचं स्टार्टअप उभारताना रात्रंदिवस मेहनत घेतली – आणि – ज्या एका मीटिंगमध्ये फंडिंग मिळणार होती आणि ज्या फंडिंगशिवाय भविष्य अंधःकारमय असणार होतं – ती मिटिंग मिस झाली तर?ड्रीम जॉबचा इंटरव्यू, कोणत्याही स्पर्धेचा दिवस, कोणत्याही परीक्षेचा क्षण…हे ७ सेकंद सगळं काही डिफाईन करतात.

ती वेळ, तो क्षण, तो दिवस काबीज करता येणं – हे सुद्धा एक स्किल आहे. ते सुद्धा शिकावं लागतं. त्याची वेगळी तयारी करावी लागते.परीक्षेच्यावेळी काही गडबड होऊ नये यासाठी तो दिवस डोक्यात इमॅजिन करावा लागतो. इन्व्हेस्टर मिटिंगची प्रिपरेशन करावी लागते. इंटरव्यूचे ड्राय रन्स घ्यावे लागतात. चाचणी परीक्षा नावाची सिस्टीम उगाच उभारली गेलेली नाही…!७ सेकंद बॉस…!७ डॅम सेकंद्स…!लेट्स रिमेम्बर द लेसन नीरज टॉट अस ऑल टुडे!चिअर्स!ओंकार दाभाडकर

पाहा व्हिडीओ –

पराग पाठक लिहितात की,

भ- भालाफेकीचा’भ’ हे अक्षर उच्चारताच उद्गारवचनी संज्ञा मुखातून बाहेर पडतात. बाराखडीत असला तरी भ हा ओवाळून टाकलेल्या मंडळींसाठी हमखास वापरला जातो. आदर, सन्मान, पुरस्कार, गौरव या कशाच्या आसपासही ‘भ’ नसतो. 7 ऑगस्ट 2021 रोजी ‘भ’ या अक्षराला भालाफेकीचं सुरेख कोंदण मिळालं. 23 वर्षीय नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

भालाफेक करण्याइतकंच जॅव्हेलिन थ्रो वगैरे म्हणणं कठीण आहे. त्या तुलनेत भालाफेक म्हणणं सोपं आहे. नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीने ‘भ’ आदरणीय गटात गेला आहे.काही दिवसांपूर्वी आर्थिक उदारीकरणाला तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बरेच लेख, परिसंवाद वाचनात आले. ते वाचताना-ऐकताना एक गोष्ट राहून गेली असं वाटलं, ते म्हणजे बदललेली मानसिकता. खणखणीत आत्मविश्वास, वेगळ्या वाटेवर स्वार होण्याची तयारी, चुका प्रांजळपणे मान्य करत पुढे जाणं, कॅरिड अवे न होणं, लहान वयात सभान होऊन जग बघणं, सोशल मीडियावर व्यक्त होणं, उगाच भावनिक न होणं. 1998 मध्ये जन्मलेल्या नीरजचं सुवर्णपदक हे नवयुगाचं द्योतक आहे. अँड्यू अमसान यांनी तीन वर्षांपूर्वी नीरजच्या गावी जाऊन सुरेख रिपोर्ताज केला होता. त्यात एक गोष्ट होती.

प्रचंड वजनामुळे लहानपणी नीरजला सरपंचजी असं चिडवायचे. हरयाणाची माती सुपीक आहे. साहजिक मंडळी खात्यापित्या घरची आहेत हे सांगावं लागत नाही. पण आपलं खाणं हे असं डोळ्यात येतंय म्हटल्यावर नीरजने मेहनतीने वजन कमी करत आणलं. 2010-11च्या बेतात भालाफेकीचं शास्त्रोक्त प्रशिक्षण सुरू केलेल्या नीरजने एक तपभरात जगातला सर्वोत्तम भालाफेकपटू होण्याची किमया साधली आहे. न्यूक्लिअर फॅमिली ही संकल्पना लोकप्रिय झालेल्या काळात सतरा जणांच्या एकत्र कुटुंबात वाढलेल्या नीरजचं सुवर्णपदक हे त्या व्यवस्थेचंही यश आहे. मनातलं बोलण्यासाठी उसने आधार घेण्याच्या काळात नीरजला मिळालेलं यश एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेल्या मंडळींचा हुरुप वाढवणारं आहे. ऑलिम्पिक तयारीबद्दल कोणत्याही खेळाडूला विचारलं की तो मी सर्वोत्तम प्रयत्न करेन. तयारी चांगली सुरू आहे अशी छापील उत्तरं देतो. रिओपासून अगदी परवापर्यंत मी ऑलिम्पिक गोल्ड आणेन हेच नीरजचे शब्द होते. या शब्दांमागे माज नव्हता, फाजील आत्मविश्वास नव्हता. प्रतिस्पर्ध्यांना कस्पटासमान लेखण्याची वृत्ती नव्हती.

हेही पाहा – Video | अप्रतिम कॅच पाहून आनंद महिंद्राही म्हणाले, ही तर सुपरवुमन

खेळाचं मर्म उमगलंय, मनाजोगती तयारी झालेय, आता जाऊन लांबवर भाला फेकत सुवर्णपदक पटकवायचं इतकं स्वच्छ नीरजला दिसत होतं. ज्युनियर लेव्हलपासूनची नीरजची कामगिरी बघितली तर तो जिथे जातो तिथे भाला फेकून विक्रम रचतो आणि पदकं कमावतो. नीरजचे सध्याचे जे कोच आहेत त्यांचं नाव उवे हॉन्स. आता वयोमानाप्रमाणे वाकलेल्या या गृहस्थांनी 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक केलेय. साधा विषयच नाही काही. भालाफेकीच्या प्रगत प्रशिक्षणासाठी नीरज फिनलंडला होता. सदरहू देश नकाशात कुठे आहे हेही आपल्याला दाखवता येणार नाही, पण नीरज तिथे होता. काही वर्षांपूर्वी एका स्पोर्ट्स चॅनेलच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अँकर नीरजपाशी पोहोचला. एक प्रश्न होता- तुझी लांब केसांची स्टाईल कोणाकडून प्रेरित आहे- शाहरूख खान का इशांत शर्मा? नीरज म्हणाला- कोणीच नाही, माझीच स्टाईल आहे. सेल्फमेड, अमुकप्रमाणे वगैरे विषय कट. खांद्यापर्यंत रुळणारा केससंभार घेऊन भालाफेक करणाऱ्या नीरजला पाहिलं की जुन्या चित्रपटात ग्रीक योद्धे असतात तसं वाटत असे. टोकियोत प्रचंड उकाडा आणि आर्द्रता यामुळे स्टाईल त्रासदायक ठरू शकते म्हटल्यावर नीरजने केस कमी केले. भलते लाड नाहीत. अथलेटिक्स स्पर्धेत एकाचवेळी अनेक इव्हेंट्स सुरू असतात.

भालाफेकीची स्पर्धा सुरू असताना दोन इव्हेंट्सचा पुरस्कार सोहळा झाला. त्या खेळांच्या पदकविजेत्याच्या राष्ट्रगीतावेळी ही स्पर्धा काही मिनिटांसाठी थांबवली जाते. नीरजच्या इव्हेंटदरम्यान दोनदा असं झालं. त्यावेळी त्याचे भाव पाहण्यासारखे होते. एखाद्याला हा व्यत्यय विचलित करू शकतो. पण नीरजचं मन जनगणमनसाठी एवढं एकाग्रचित्त झालं होतं की अन्य इव्हेंट्सच्या विजेत्यांच्या राष्ट्रगीतावेळी त्याच्या देहबोलीत कणभरही बदल झाला नाही. नीरजने पहिलाच भाला इतक्या दूरवर फेकला त्यावेळी एवढ्या दूर तर जायलाच हवा असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. दुसराही तिथेच पोहोचला. त्यानंतर बाकी सगळ्यांची दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठीची लढाई सुरू होती. तरबेज एवढं असावं की आसपासही कुणी फिरकू नये.

23व्या वर्षी काखेत ओंडके घेतल्यासारखे ‘मेरा बाप कौन है तू नही जानता’ वळणाचे हंक दिल्ली पट्ट्यात सर्रास दिसतात. नीरजचा खेळ आणि देहयष्टी तशीच पण सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने या मंडळींपासून वेगळं असल्याचं दाखवून दिलं. त्याने ट्रॅकला आणि नंतर पदकाला नमस्कार केला. आयुष्य बदलून टाकणाऱ्या दोन गोष्टींना वंदन करण्यातून पाय जमिनीवर असल्याचं दाखवून दिलं. ज्यांना सहज हरवलं त्यातल्या बहुतांशांना नीरजने घट्ट मिठी मारली. कारण अनेकजण त्याचे चांगले मित्र आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे.नीरजची मॅच सुरू असताना भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. टेस्ट मॅचच्या कॉमेंट्री टीममध्ये सुनील गावस्करांचा समावेश आहे. गावस्करांनी बाकी क्रूसह नीरजची मॅच बघितली. मेरे देश के धरती गाणं म्हटलं आणि नंतर जिलेब्यांचा आस्वादही घेतला.

एका खेळातला दिग्गज एका तरण्याबांड मुलाच्या यशाचा साक्षीदार होतो आणि त्याच्या वयाचा होऊन तो आनंद साजरा करतो ही खेळाची ताकद आहे. क्रिकेट मॅचच्या प्रसारणादरम्यान सातत्याने नीरजची मॅच दाखवली गेली. पदक मिळतानाचा क्षण आणि जनगणमन वारंवार दाखवलं गेलं. क्रिकेट मॅचच्या प्रसारणात भालाफेक दिसणं यातून सुवर्णपदकाची ताकद आणि दुर्मीळत्व सिद्ध होतं. अॅथलेटिक्समध्ये अनेकदा काही सेकंदांनी, काही मिलीमीटरने आपलं पदकाचं स्वप्न भंगलं आहे. नीरजने पदक काही दिवसांपूर्वीच हे जग सोडलेल्या मिल्खा सिंगना समर्पित केलं. या मशालीचं आदानप्रदान व्हर्च्युअल व्हायचं होतं. 13 वर्षांनंतर अभिनव बिंद्राला साथीदार मिळाला आहे. अभिनव सधन घरातला. मितभाषी आणि इंटलेक्च्य़ुअल माणूस. योग, ध्यानधारणा असं सगळं करणारा अभिनवलाही पदकानंतर सावरताना कठीण गेलं होतं. अभिनवच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

हेही वाचा – सख्ख्या बहिणीच्या लग्नात गेली नव्हती, रौप्य पदक विजेती मीराबाई जानू कारण…

नीरजचं वय लहान आहे. आतापर्यंत आपण बरं, आपला भाला बरा हे आयुष्य जगणारा नीरज आता पोस्टर बॉय झाला आहे. त्याला झोपायला, श्वास घ्यायला फुरसत मिळणार नाही इतका तो बिझी होऊन जाईल. त्याला वैयक्तिक असं आयुष्यच उरणार नाही. त्याच्या संदर्भातल्या अनेक ऐकीव दंतकथा व्हायरल होतील. 297 जण त्याची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतील. आपल्याला आणखी सुवर्णपदकवीर हवे असतील तर खेळाडूंना पदकानंतर घेरण्याऐवजी आधी मदत झाली तर बरं होईल. क्रीडा मंत्रालय, साइ, टॉप्स योजना, स्पोर्ट्स एनजीओ यांचं काम नेटाने सुरूच आहे पण तरीही अनेकजण अजूनही पायाभूत सुविधांसाठी वंचित आहेत. रॅग्ज टू रिचेस स्टोऱ्या खपणीय असतात पण तशी वेळच का यावी. सर्वोत्तमाच्या ध्येयाऐवजी अस्तित्वासाठी संघर्ष का करावा लागावा? शनिवारी सकाळी आपलीच गोल्फपटू अदिती अशोकचं पदक अगदी निसटत्या फरकाने हुकलं. तिची मॅच सुरू असताना वादळाचा बावटा फडकला. ते वादळ सौम्य निघालं पण टोकियात त्याच शनिवारच्या संध्याकाळी एक झळाळतं वादळ घोंघावलं.

ऑलिम्पिकचे पडघम वाजू लागल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक चमूशी संवाद साधल्यानंतर, टोकियोत ऑलिम्पिक सुरू झाल्यावरदेखील नीरज चोप्रा हे नाव अगदी ठराविक लोकांनाच माहिती होतं. कारण खेळ हा विषय बऱ्याच लोकांच्या आयुष्याच्या सिलॅबसमध्ये नाही. खेळतही नाहीत, पाहतही नाहीत. भालाफेक असा काही खेळ असतो हे काही वर्षांपूर्वीपर्यंत खुद्द नीरजच्या घरच्यांनादेखील माहिती नव्हतं. तर आपली काय कथा… अदितीच्या मॅचचा निकाल लागला आणि अमेरिकेने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची शंभरी गाठली. आपण दुहेरी संख्येएवढी पदकंही गाठलेली नाहीत आणि पदकांचा पहिला रकाना रिकामाच आहे याची खंत होती. नीरजने नुसता हा रकाना भरला नाही तर अब्जावधी देशवासीयांच्या मनाच्या रकान्यात जागा केली, कायमची. हे अढळस्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही…

हेही वाचा – Tokyo 2021 : अभिमानास्पद! रस्त्यावर कचरा गोळा करणारा जेव्हा ऑलिम्पक मेडल जिंकतो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!