‘चक दे इंडिया’! भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक

भारतीय महिला हॉकी संघाची अभिमानास्पद कामगिरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : टोकियोमध्ये सुरु असलेल्या क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघानं की किमया केली आहे. या विजयानंतर चक दे सिनेमातील थराराक विजयाप्रमाणे आनंद आणि जल्लोष देशभर साजरा केला जातोय.

ऐतिहासिक

भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने १-० च्या फरकाने पराभूत केल आणि उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवलाय आणि मोठ्या थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

अशी जिंकली मॅच

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाली. त्यामुळे तिलामैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलनंतर एकच जल्लोष करण्यात आला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला एकही गोल करण्याची संधी भारतीय महिला हॉकी संघाने या सामन्यात दिली नाही. निर्विवाद वर्चस्व राखत भारतानं शानदार विजयाची नोंद केली आहे.

दरम्यान, या आधीच भारतीय पुरुष हॉकी संघानेही सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. त्यानंतर आता महिला हॉकी संघानेही सेमी फायनमध्ये शानदार एन्ट्री केल्यानं देशातील सर्वच क्रीडप्रेमींना हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!