मुंबई चेन्नईत अस्तित्वाची लढाई, पराभूत झाल्यास…

मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या स्पर्धेत चेन्नई मुंबईविरुद्ध टिकून राहण्याचे उद्दिष्ट ठेवेल, तर मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. चेन्नई आणि मुंबई या आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला आहे. मुंबई आता प्रतिष्ठेसाठी खेळेल, तर चेन्नई तांत्रिकदृष्ट्या अजूनही धावत आहे. मुंबईकडून पराभूत झाल्यास चेन्नईसुद्धा स्पर्धेतून बाहेर पडेल.
हेही वाचाः१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्यटक म्हणून…

रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडला होता

चेन्नईने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ९१ धावांनी पराभव केला आणि त्यांच्याकडून ही गती कायम राखण्याची अपेक्षा आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध ८७ धावा केल्या. त्याचा सलामीचा जोडीदार रुतुराज गायकवाडकडूनही त्याला सहकार्य अपेक्षित आहे. रवींद्र जडेजासाठीही हा मोसम दुःस्वप्नासारखा होता आणि त्यानेही कर्णधारपद अर्धवट सोडले. दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यामधूनही तो बाहेर पडला आहे.
हेही वाचाःआंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत…

चेन्नईला मोठी धावसंख्या उभारावी लागणार

मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला मोठी धावसंख्या उभारावी लागेल, त्यासाठी सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. गेल्या वेळी दोन्ही संघांच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपली फिनिशिंग स्टाईल दाखवत विजय मिळवला होता. सीएसकेने दिल्लीला ११७ धावांत गुंडाळले होते. मोईन अलीने तीन बळी घेतले तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. या तिघांना चांगली कामगिरी करावी लागेल, तर फिरकीपटू महेश तेक्षानाची चार षटकेही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असेल.
हेही वाचाःकोंकणीसह 7 भारतीय भाषांचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश…

सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर

मुंबईसाठी उर्वरित सामने औपचारिकता असून त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कर्णधार रोहित शर्मा (२०० धावा) आणि इशान किशन (३२१ धावा) यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. केकेआरविरुद्ध डळमळीत झालेल्या मुंबईच्या मधल्या फळीलाही आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशा स्थितीत तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर जबाबदारी अधिक असेल. बुमराहला गोलंदाजीमध्ये वेग आला आहे आणि तो इतर गोलंदाजांचा पाठिंबा शोधणार आहे. डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय सिंग यांना चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागेल.
हेही वाचाःदाऊदचे ‘चेले’ हादरले ; ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता…

रवींद्र जाडेजा उर्वरित सामन्यांना मुकणार

चेन्नई सुपर किंग्ज संघाची यंदाची कामगिरी अत्यंत खराब असल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पण आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संघाचा हुकमाचा एक्का म्हणजेच रवींद्र जाडेजा उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. जाडेजाच्या बरगडीला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएलचे उर्वरित सामने खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जडेजाला दुखापत झाली होती. एवढेच नव्हेतर दुखापतीमुळे त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. त्यानंतर आता अधिकृतपणे चेन्नई सुपरकिंग्सनेही याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पडताळणी सुरू, ‘हे’ आहे कारण…

आजचा सामना

चेन्नई वि. मुंबई
स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!