आली रे आली, टीम इंडियाची नवी जर्सी आली

टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवी जर्सी प्रदर्शित केली आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा मेन इन ब्लू या ड्रेसकोडमध्ये दिसणार आहे. या जर्सीत ऑफिशियल किट प्रायोजक म्हणून एमपीएलचा लोगो आहे. या व्यतिरिक्त टीम इंडियाचा प्रायोजक म्हणून बायजूसचाही लोगो आहे. केएल राहुल, संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा नव्या जर्सीत दिसत आहेत.

टीम इंडिया १८ ऑक्टोबरला आपला पहिला सराव सामना खेळणार

टीम इंडिया १८ ऑक्टोबरला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या दिवशी टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश

भारतीय संघात विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे.

विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स

विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स म्हणजेत ३ कोटी रुपये मिळणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!