विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला

BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: टी -20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. आयसीसी वर्ल्ड टी 20नंतर विराट कोहली टी -20 आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतात चर्चांना एकच उधाण आलं आहे.

टीम इंडियाचा वन डे आणि टी 20 संघाची धुरा विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवले जाण्याचे वृत्त नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. मात्र त्यानंतर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी या सर्व बातम्या निराधार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कर्णधार बदलण्याचा प्रश्नच नाही: जय शाह

बीसीसीआयच्या सचिवांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे भविष्य ठरवले आहे. त्यांनी टी -20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियातील बदलावरून निर्माण झालेले सर्व संभ्रम दूर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीवर भर देताना सांगितले की, सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या आणि टीम इंडियात कर्णधारपदाचे विभाजन झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली एकदिवसीय आणि टी -20 मध्ये कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवेल. विराट फक्त कसोटी क्रिकेटचा कर्णधार असेल, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्या बातम्यांवर आता खुद्द जय शाह यांनी पडदा टाकला आहे. टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोहलीचं कर्णधारपद

जय शाह यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाला संघाच्या कामगिरीशी जोडलं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर टी 20 मध्ये विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरी केल्याचंही शाह म्हणाले. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी 20 किंवा वन डेमध्ये सहसा पराभूत झालेली नाही.

भारताने इंग्लंडविरुद्ध 3–2 असा विजय मिळवला, ऑस्ट्रेलियामध्ये 2-1 ने जिंकले, श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केले आणि न्यूझीलंडला 4-0 ने हरवले. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताला ICC स्पर्धेची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याच्यासमोर आयसीसी स्पर्धा जिंकणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.

भारताने गेल्या आठवड्यातच टी -20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं जात आहे.

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)

भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हा व्हिडिओ पहाः GANESH VISARJAN | गिरीत गणेश विसर्जन स्थळाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!