सनरायझर्सपुढं मुंबईचा ‘सूर्य’ तळपला

34 धावांनी विजय, बोल्ट ठरला भारी, वॉर्नर, बेअरस्टोची खेळी व्यर्थ

सचिन दळवी | प्रतिनिधी

शारजाह : आयपीएलच्या डबल हेडरमधील रविवारच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी मात केली. मुंबईने २० षटकांत 5 गडी गमावून 208धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 174 धावांपर्यंत मजल मारू शकला.
मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. संदीप शर्माच्या पहिल्याच षटकात षटकार मारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांनी डाव सावरला. सूर्यकुमारला चांगला सूर गवसल्याचे भासत असताना सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर तो 27 धावांवर बाद झाला. इशान किशन आणि क्विंटन डी कॉक जोडीने 78 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईला पुढे नेले.


राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डी कॉक (67) माघारी परतला. यानंतर इशान किशनही बाद झाला. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत मुंबईला 208 धावांचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने 2 तर राशिद खानने 1 बळी घेतला.
वॉर्नर-बेअरस्टोची सलामी अपयशी
लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि बेयरेस्टो स्फोटक दिसले. परंतु त्यांच्या स्फोटक खेळीला बोल्टच्या वेगाचा करंट लागला. संघाच्या 34 धावा असताना बेअरेस्टो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या जागी उतरलेल्या मनीष पांडेने 19 चेंडूत 30 धावा कुटल्या.
बोल्टचा करंट
मनीष पांडे बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि विलियम्सन यांची भागीदारी ट्रेंट बोल्टने संपुष्टात आणली. डेव्हिड वॉर्नर केवळ एका टोकाला झुंज देताना मोसमातील पहिले अर्धशतक ठोकले. दुसऱ्या टोकाकडून त्याला मदत मिळत नसल्याने वेगवान धावा फटकावण्याच्या प्रयत्नात वॉर्नर (60) इशान किशनला झेल देऊन तंबूत परतला. अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी काही चांगले फटके लगावले पण ते पुरेसे नव्हते. यंदाच्या मोसमात सनरायझर्सचा हा तिसरा पराभव आहे.
धावफलक :
मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 5 बाद 208 धावा
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 7 बाद 174 धावा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!