ROUND THE WICKET | वर्ल्ड कपच्या ऐन तोंडावर ‘एक्स्परिमेंट’ पडलं भारी; भारताच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

ऋषभ | प्रतिनिधी
वेबडेस्क 07 ऑगस्ट | वस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला दोन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते, वेस्ट इंडिज संघाने हे लक्ष्य सात चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत इतिहास रचला आहे, तर टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

वेस्ट इंडिजने इतिहास रचला
दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिज संघाने सलग दोन सामने जिंकले. कोणत्याही T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकण्याची वेस्ट इंडिज संघाची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय, 2011 नंतर हे प्रथमच घडले आहे, जेव्हा वेस्ट इंडिजने तीनपैकी कोणत्याही फॉरमॅटमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे.

टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने गमावणारा आशियाई संघ बनला आहे. भारतीय संघाने बांगलादेशशी बरोबरी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 9व्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशनेही वेस्ट इंडिजविरुद्ध नऊ सामने गमावले आहेत.

कसा झाला सामना?
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. टिळक वर्माच्या 41 चेंडूत 51 धावा, ईशान किशनच्या 27 धावा आणि हार्दिक पंड्याच्या 24 धावा. निकोलस पूरनच्या 40 चेंडूत 67 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने 18.5 षटकांत लक्ष्य गाठले. अकील हुसेन (10 चेंडूत नाबाद 16) आणि अल्झारी जोसेफ (08 चेंडूत नाबाद 10) यांनी 25 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

वर्ल्ड कप ऐन तोंडावर तरी भारताचे ‘एक्सपेरिमेंट’
तसे पाहता एकदिवसीय सामन्यांत देखील आपण भारताचे नवनवीन प्रयोग या आधी पाहिलेले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने ईशान किशन आणि शुभमन गिलसह सलामी दिली. कर्णधार रोहित शर्मा हा संघाचा नियमित सलामीवीर असून तो विश्वचषकातही सलामी करणार आहे, त्यामुळे त्याला सलामीवीराची भूमिका देण्यात यावी. पहिल्या सामन्यात रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचे गूढ अद्याप उकललेले नाही. या क्रमांकावर सूर्य कुमार यादवचा प्रयत्न सुरू आहे, पण तोही आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. दुसऱ्या वनडेत संजू सॅमसनलाही संधी देण्यात आली होती, पण त्यानेही निराशा केली. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर निश्चित आहे, पण चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करण्याची गरज आहे. श्रेयस अय्यरने या क्रमांकावर छाप पाडली आहे, पण दुखापतीमुळे तो हैराण झाला आहे. केएल राहुलच्या फिटनेसबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. संघाला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी फलंदाज ठरवावे लागतील आणि त्यांना वारंवार संधी द्याव्या लागतील. फलंदाजीच्या क्रमवारीतील बदलांमुळे फलंदाजाच्या मनात अनिश्चितता निर्माण होते.

गोलंदाजही अजून ठरलेला नाही
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या त्रिकुटासह भारतीय संघ विश्वचषकात दाखल झाला आहे. हे तिन्ही गोलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेचा भाग नाहीत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात मुकेश कुमार, उमरान मलिक, जयदेव उनतकट सारखे वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांना विश्वचषक संघात स्थान मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत विश्वचषकाची तयारी कशी करणार, हा गंभीर प्रश्न आहे.

2019 मध्येही असाच प्रयोग करण्यात आला होता.
2019 च्या विश्वचषकापूर्वीही भारतीय संघाने असाच प्रयोग केला होता. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंवर प्रयत्न केले गेले. केदार जाधव, सिद्धार्थ कौल, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, खलील अहमद हे खेळाडू संघात आणि बाहेर फिरत राहिले. याचाच परिणाम असा झाला की भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास निश्चितपणे पूर्ण केला, पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. आता पुन्हा तोच प्रयोगाचा सिलसिला नव्याने सुरू झाला असल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा शंकांची पाल चुकचुकतेय.
