‘मुंबई इंडियन्स’चा CSKला ‘दुहेरी’ दणका;

CSKवर पहिल्यांदा ओढवली 'ही' नामुष्की

Goan Varta Live | प्रतिनिधी

शारजहा – चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय प्राप्त केलाय. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त 114 धावा केल्यात. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलंय. किशनने नाबाद 67 तर डी कॉकने नाबाद 46 धावा केल्या आणि मुंबईला 10 गडी राखून विजय मिळवून दिलाय.

चेन्नई सुपर किंग्जने आजपर्यंत दोन वेळा 10 गडी राखून विजय मिळवला होता, पण चेन्नईच्या गोलंदाजांना डावात एकही गडी बाद करता आला नाही अशी गोष्ट प्रथमच घडलीये. 10 गड्यांनी पराभव होण्याची ही चेन्नईच्या संघाची संपूर्ण IPL कारकिर्दीतील पहिली वेळ ठरलीये. मुंबईच्या सलामी जोडीनेच चेन्नईच्या अपेक्षांचा चक्काचूर केलाय. याचसोबत चेन्नईच्या प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याच्या आशांनाही सुरूंग लागलाय. IPLच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरू शकला नाहीये. त्यामुळे मुंबईविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईला दुहेरी दणका बसलाय.

असा रंगला सामना…

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (0), अंबाती रायडू (2), जगदीशन (0), फाफ डु प्लेसिस (1) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (7) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनीही स्वस्तात (16) बाद झाला. पण नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने 45 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने 4 गडी टिपले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि क्विंटन डी कॉक जोडीनेच मुंबईला विजय मिळवून दिलाय. इशान किशनने नाबाद 67 तर क्विंटन डी कॉकने नाबाद 46धावा केल्यात.

हेही वाचा

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

https://www.goanvartalive.com/national/kapil-dev-has-undergone-a-successful-angioplasty/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.