IPL 2020 मुंबई इंडियन्सने मिळवलं अव्वल स्थान

रोहित-पोलार्डची दमदार खेळी : गोलंदाजीत चहर, बुमराह, पॅटिन्सन त्रिकुट चमकले.

सचिन दळवी | प्रतिनिधी

अबुधाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात करत मुंबईने या हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 48 धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने 191 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावाच करू शकला. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकुटाने प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.

मुंबईने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरुवात झाली. मयंक अग्रवाल 25 धावा करून माघारी परतला. पाठोपाठ करूण नायर शून्यावर बाद झाला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या लोकेश राहुल मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. राहुल 17 धावांवर माघारी परतला. 3 गडी झटपट बाद झाल्यावर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी मोक्याच्या क्षणी आश्वासक फटकेबाजी करत चांगली भागीदारी केली. पूरन आणि मॅक्सवेल यांची जमलेली जोडी पॅटिन्सनने फोडली. दमदार फटकेबाजी करणारा पूरनने 27 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 44 धावा केल्या. पाठोपाठ मॅक्सवेलही मोठा फटका मारताना 11 धावांवर माघारी परतला. कृष्णप्पा गौतमने थोडीफार फटकेबाजी केली पण अखेर पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने जोरदार फटकेबाजी करत 20 षटकांत 191 धावा केल्या. रोहित शर्माने अत्यंत संयमी खेळी करत 70 धावांची खेळी केली. पण शेवटच्या षटकांमध्ये पांड्या-पोलार्ड जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने 20 चेंडूत नाबाद 47 धावा कुटल्या. तर हार्दिकने 11 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या आणि पंजाबला 192 धावांचे आव्हान दिले.

प्रथम फलंदाजी करताना फॉर्मशी झुंजणारा क्विंटन डी कॉक या सामन्यातही अपयशी ठरला. पहिल्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला शून्यावर त्रिफळाचित केले. त्यानंतर फिरकीपटूच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना सूर्यकुमार यादव धावचित झाला. मोहम्मद शमीने फेकलेला चेंडू थेट स्टंपवर लागला आणि सूर्यकुमार यादव (10) माघारी परतला.

रोहित-किशनची अर्धशतकी भागिदारी
रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना इशान किशन झेलबाद झाला. त्याने 32 चेंडूत 28 धावा केल्या. डावाच्या सुरुवातीला अतिशय संयमी खेळी करणाऱ्या मुंबईच्या ‘हिटमॅन’ने 40 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादात रोहित शर्मा (70) बाद झाला. त्याने 48 चेंडूच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार खेचले. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या-पोलार्डने तुफान फटकेबाजी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!