MI च्या मालक नीता अंबानी यांना आशा आहे की WPL तरुण मुलींना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यास प्रेरित करेल

ऋषभ | प्रतिनिधी

महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना शनिवारी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्यासाठी टीमच्या मालक नीता अंबानीही उपस्थित होत्या. स्पर्धेतील पहिलाच सामना उत्साहाने भरलेला होता. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील लोकांनी आपापल्या संघांना जोरदार पाठिंबा दिला. नीता अंबानी यांनी प्रत्येक चेंडूवर खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अधिकाधिक महिला खेळाडूंनी हे खेळ भारतात खेळावेत अशी त्यांची इच्छा आहे.
काय म्हणाल्या नीता अंबानी
सामना संपल्यानंतर नीता अंबानी यांनी दरवेळेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली आणि सर्वांशी चर्चा केली. नीता अंबानी म्हणाल्या की, “WPL चा उद्घाटनाचा दिवस कधीही विसरता येणार नाही. खेळातील महिलांसाठी हा एक प्रतिष्ठित दिवस आणि प्रतिष्ठित क्षण आहे. WPL चा भाग बनणे खूप रोमांचक आहे.” सकारात्मक वातावरणाची स्तुती करताना डब्ल्यूपीएलमुळे अधिकाधिक महिलांना खेळात करिअर करण्यास मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नीता अंबानी पुढे म्हणाल्या, “मला आशा आहे की यामुळे देशभरातील तरुण मुलींना खेळात सहभागी होण्यास मदत होईल, प्रयत्नांची कास सोडू नका, तुमची स्वप्ने आणि तुमच्या हृदयाचे अनुसरण करा.”
मुंबई इंडियन्सकडे स्टार पॉवरने भरलेला संघ आहे आणि त्यांचा पहिला सामना सर्वार्थाने परिपूर्ण होता कारण अनुभवी आणि तरुण खेळाडू पुढे येऊन आपल्या जवाबदाऱ्या पार पाडल्या. नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, “मुंबई इंडियन्सचा संघ हा नेहमीच निर्भय आणि रोमांचक प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातो , आज आमच्या मुलींनी खूप चांगला खेळ केला . संघ ज्या पद्धतीने खेळला त्याचा मला खूप अभिमान आहे. हा सामना एक उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे उदाहरण होते .” कर्णधार हरमनच्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

सामना पाहण्यासाठी मैदानावर आलेल्या सर्व चाहत्यांचेही त्यांनी आभार मानले. MI पलटनला उद्देशून विशेष संदेशात त्या म्हणाल्या, “स्टेडिअममध्ये इतके लोक पाहून खूप आनंद झाला, महिला आणि पुरुष , आमच्या महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर आलात याबद्दल खूप आभार. मी या स्पर्धेच्या उद्धघाटनाची आतुरतेने वाट पाहत होते, सर्व संघांना स्पर्धेतील पूढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा.”
सामना कसा होता
या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकात 207 धावा केल्या. यादरम्यान हरमनप्रीत कौरने 65, हेली मॅथ्यूजने 47 आणि अमेलिया कारने 45 धावा केल्या. 208 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सचा डाव 64 धावांत आटोपला आणि मुंबईने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.
