सख्ख्या बहिणीच्या लग्नात गेली नव्हती, रौप्य पदक विजेती मीराबाई जानू कारण…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : टोकियोतून भारतासाठी पहिली आनंदाची बातमी आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलंय. पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांनी मीराबाईंचं कौतुक केलंय. अभिनंदनाचा वर्षाव केलाय. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केलीये. भारताला पहिलं रौप्य मिळून देणाऱ्या मीराबाई यांचा आतापर्यंतचा प्रवास हा संघर्षाने खच्चून भरलेला असा आहे. त्यांच्या या प्रवासातून मानसिकरीत्या खचलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी असा आहे.

जेव्हा ठरवून टाकलं, की वेटलिफ्टरच व्हायचंय!

मीराबाईंचा जन्म झाला 8 ऑगस्ट 1994ला. ठिकाण होतं… मणिपूरमधलं एक छोटसं गाव. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर. मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मीरबाईंनी वेटलिफ्टर होण्याचा ध्यास घेतला.

जिद्दी आणि मेहनती!

मीराबाई प्रचंड जिद्दी. आपल्या जिद्दीपुढे मीराबाईंच्या आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे लोखंडाचा बारही नव्हता. अक्षरशः बांबूच्या बारनं मीराबाईंनी सरावाला सुरुवात केली. छोट्याशा गावात कुठं आलंय, प्रशिक्षण केंद्र. सरावासाठी मीराबाईंना तब्बल ५० ते ६० किलोमीटरचा पल्ला गाठावा लागायचा. डायटही तगडा लागणार होता. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मीराबाईंचा प्रवास वेटलिफ्टर होण्यासाठी सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष करावा लागणार आहोत. पण मीराबाईंनी कुठेच हार मानली नाही.

रोलमॉडेलचाच रेकॉर्ड ब्रेक

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मीराबाई 15 वर्षांच्या आतील चॅम्पियन बनल्या. त्यानंतर मागे वळून पाहायचंच नव्हतं मीराबाईंना. वय वर्ष सतरा. आणखी एक चॅम्पियनशिपवर आपलं नाव त्यांनी कोरलं. १७ व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियनशीप जिंकून मीराबाईंनी आपल्या दखल घ्यायला सगळ्यांना भाग पाडलं. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं ध्येय बाळगून होत्या, त्यांचाही विक्रम मीराबाईंनी मोडला. कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडला तो 192 किलो वजन उचलून.

संघर्षाला शॉर्टकट नसतो!

मीराबाईंचा प्रवास अजिबात सोपा नाही. अत्यंत संघर्षपूर्ण कामगिरीतून मीराबाई घडत गेल्या. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मीराबाईंच्या पालकांजवल पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. पण ही मीराबाईंनी येऊनच दिली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.

2016च्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर ‘डिड नॉट फिनिश’ असं लिहिलेलं होतं. जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले गेले. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं. पण हा दिवस कधीही न विसरता येण्यासारखा होता.

सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या पूर्णपणे मानसिकरीत्या खचल्या होत्या. डिप्रेशनमध्ये गेल्या. दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार घेतली नाही. पुन्हा जोमानं सराव सुरु केला. मेहनत घेतली. पुन्हा नव्या दमानं जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. 48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचललं आणि मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या. हे ऐतिहासिक गोष्ट आहे. यामागे प्रचंड मेहनत, सातत्य आणि कधीही हार न मानण्याची मीराबाईंची जिद्द होती.

विशेष म्हणजे 48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या. आपल्या खेळाप्रती वाट्टेल तो त्याग करणाऱ्या मीराबाईंनी पुन्हा एकदा इतिहास रचलाय. मीराबाई चानू यांच्या कामगिरीला गोवन वार्ता लाईव्हचा सलाम!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!