कोलकातासाठी शुभमन ठरला ‘नाईट रायडर’

आयपीएलच्या आठव्या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सचा पराभव; मॉर्गनचीही चांगली साथ

सचिन दळवी | प्रतिनिधी

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 8व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात कोलकाताच्या शुभमन गिलने नाबाद 70 धावांची खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली तर इयान मॉर्गननेही नाबाद 42 धावा केल्या. 143 धावांचे लक्ष्य कोलकाताने 18 षटकांत गाठले.

हैदराबादच्या लहान लक्ष्याचा पाठलाग करणांऱ्या कोलकाताची सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्याच षटकात त्यांनी सलामीवीर सुनील नरेनच्या रुपात पहिला गडी गमावला. नरेन खातेही उघडू शकला नाही. त्याला खलील अहमदने बाद केले. सुनील बाद झाल्यानंतर शुभमन गिलने नितीश राणासोबत मिळून कोलकाताचा डाव पुन्हा रुळावर आणण्यास सुरुवात केली. यात दोघांना यशही आले. परंतु ही भागीदारी आता हैदराबादसाठी डोकेदुखी बनणार त्यापूर्वी नटराजनने यष्ट्यांच्या मागे बाद केले.

दिनेश कार्तिककडून निराशा
दोन गडी बाद झाल्यानंतर कोलकाताला कर्णधार दिनेश कार्तिककडून मोठी अपेक्षा होती. मात्र तो ही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही व बाद झाला. त्याला राशिद खानने खातेही उघडू दिले नाही. तो तीन चेंडू खेळून पायचीत झाला. अशाप्रकारे कोलकाताने आपला तिसरा गडी 6.2 षटकांत 53 धावांवर गमावला.

गिल-मॉर्गनची भागीदारी अन् विजय
कार्तिक बाद झाल्यानंतर आलेल्या इयान मॉर्गनने गिलला चांगली साथ दिली. कमी धावसंख्या असल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी धावा करण्याची घाई केली नाही व खराब चेंडूंना मैदानाबाहेर पाठवण्यास वेळ दौडला नाही. दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी 92 धावांची अभेद्य भागीदारी झाली. अखेर या दोघांनी मिळून आपल्या संघाला या सत्रातील पहिला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी आयपीएल 2020च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजय मिळवण्यासाठी 143 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून मनीष पांडेने सर्वाधिक 51 धावा केल्या आणि संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. मागील सामन्यात खराब गोलंदाजीमुळे टीकेचा सामना करणार्‍या केकेआरने या सामन्यात अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि हैदराबादला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखले.

अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांशी भिडत होते.

हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली नव्हती आणि चौथ्या षटकात धडाकेबाज सलामीवीर जॉनी बेयरस्टोची विकेट पडली. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स खूपच महाग असल्याचे सिद्ध झाले, यावेळी त्याने केकेआरने त्याला 15.5 कोटी रूपयांत का विकत घेतले हे दाखवून दिले.
चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने बेयरेस्टोला बोल्ड केले. कमिन्सच्या आत येणाऱ्या चेंडूला ऑफ साईडमध्ये ड्राईव्ह लागवण्याच्या प्रयत्नात बेयरेस्टो चुकला व त्रिफळाचीत झाला. त्याला केवळ 5 धावा करता आल्या.

यानंतर क्रीजवर आलेल्या मनीष पांडेने कर्णधार वॉर्नरबरोबर डाव हाताळला. तथापि, केकेआरच्या गोलंदाजांनी या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि त्यांची लाईन व लेंथ सुधारली, ज्याचा संघाला फायदा झाला. हैदराबादचे दोन्ही फलंदाज खुलून धावा करू शकले नाहीत. 9 षटकांत संघ केवळ 59 धावा करू शकला.

या सामन्यात केकेआरच्या टीममध्ये समाविष्ट असलेल्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने खूप प्रभावित केले. वॉर्नर आणि पांडेला बांधून ठेवण्यात वरुणने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यानंतर त्याला यशही मिळाले. दहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने वरुणच्या गोलंदाजीत त्याच्याकडेच झेल सोपवला व त्याने झेल घेण्यात चूक केली नाही. वॉर्नरने 36 धावा केल्या.
तथापि, येथून, पांडेने वृद्धिमान सहासह धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु कमिन्स, शिवम मावी, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी दोघांना बांधून ठेवले. दरम्यान, पांडेने काही चांगले फटकेबाजी करत 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

हैदराबादने 15 षटकांपर्यंत केवळ 2 गडी गमावले होते, परंतु संघाची धावसंख्या कमी होती आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. पांडेला (51) आंद्रे रसेलने बाद केल्याने हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येची आशा संपुष्टात आली. सहाने 30 धावा केल्या पण त्यासाठी त्याने 31 चेंडू खेळले.

हैदराबादच्या डावात फक्त 4 षटकार आणि 8 चौकार बसले. यावरून कोलकताच्या गोलंदाजीत असलेली शिस्तबद्धता दिसून आली. हैदराबाद अखेरच्या 5 षटकांत केवळ 43 धावा करु शकला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 142 धावा केल्या.

कोलकाताकडून कमिन्सने 4 षटकांत अवघ्या 18 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. त्याच्या व्यतिरिक्त वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला, तर साहा धावबाद झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!