एटीके बागानचा रॉयल विजय

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गतविजेत्या एटीके मोहन बागानने शानदार विजयी सलामी दिलीये. कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सला 1-0 असे पराभूत करत बागानने आपल्या मोहिमेला विजयी प्रारंभ केलंय. फिजीचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने 67व्या मिनिटाला केलेला गोल शेवटी निर्णायक ठरला.
बदली खेळाडू मानवीर सिंग याने ही चाल रचली. 63व्या मिनिटाला प्रशिक्षक हबास यांनी त्याला आघाडी फळीत उतरविले होते. मध्य फळीतील प्रोणय हलदर याच्याऐवजी त्याला संधी देत आक्रमण भक्कम करण्यात आलेले. मानवीरने हे डावपेच यशस्वी ठरविले.त्याने डावीकडून मुसंडी मारली आणि चेंडू गोलक्षेत्रात मारला. ब्लास्टर्सच्या व्हिन्सेंट गोमेझ आणि सर्जिओ सिदोंचा या मध्य फळीतील प्रतिस्पर्ध्यांना तो सफाईने अडविता आला नाही. सिदोंचा याच्या डोक्याला लागून चेंडू कृष्णापाशी गेला. मग कृष्णाने मैदानालगत सफाईदार फटका मारत ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याला चकविले. गत मोसमात कृष्णाने 21 सामन्यांत 15 गोल केले होते. सर्वाधिक गोल करणा-या खेळाडूंमध्ये त्याने संयुक्त अव्वल क्रमांक मिळविला होता.
किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने प्रारंभ करण्याचे ध्येय बाळगलेल्या ब्लास्टर्सकरीता सुरुवात अपयशी झाली. त्यामुळे बचावपटूंच्या पासिंगमध्ये अचूकता नव्हती. परिणामी गोलरक्षक अल्बीनो गोम्सची कसोटी लागली. पहिली संधी एटीके बागानने निर्माण केली. दहाव्या मिनिटाला एटीके बागानच्या संदेश झिंगान याने ब्लास्टर्सचा परदेशी फॉरवर्ड गॅरी हुपर याला मध्य रेषेपाशी रोखले. त्यावेळी पंचांनी ते फाऊल ठरविले. त्यातून मिळालेल्या फ्री किकवर काही घडले नाही. यानंतर कृष्णाची एक चाल ब्लास्टर्सचा बचावपटू कोस्टा न्हामोईनेसू याने रोखली. 26व्या मिनिटाला एदू गार्सियाने घेतलेल्या कॉर्नरवर एटीके बागानचा मध्यरक्षक कार्ल मॅक्ह्युज याला अचूकता राखता आली नाही. ब्लास्टर्सची संधी 37व्या मिनिटाला हुकली. ऋत्विक दास याच्या समोर चेंडू पडला आणि उडाला. त्यामुळे ही संधी वाया गेली.
हेही वाचा
गोव्याच्या स्नेहलची मोठी कामगिरी, नजर पात्रतेकडे…