मॉरीसिओमुळे ओडिशाने जमशेदपूरला रोखले

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्को: सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत जमशेदपुर एफसीविरुद्ध रविवारी ओडिशा एफसीने दोन गोलाच्या पिछाडीनंतर २-२ अशी बरोबरी साधत एक गुण खेचून आणला. या निकालामुळे सातव्या मोसमातील चुरस उत्तरोत्तर वाढत असल्याचे दिसून आले.
वास्को येथील टिळक मैदानावर ही लढत पार पडली. ओडिशाच्या बचाव फळीतील गौरव बोरा याने ११व्या मिनिटाला वॅल्सकीसचा फटका हाताने अडविला. त्यामुळे बोराला येल्लो कार्ड आणि जमशेदपूरला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर वॅल्सकीसने शांतचित्ताने फटका मारत चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात घालवला. त्यावेळी ओडिशाचा गोलरक्षक कमलजीत सिंग याचा अंदाज चुकला.
जमशेदपूरकडे मध्यंतरास दोन गोलांची भक्कम आघाडी होती. १६ मिनिटांचा खेळ बाकी असताना जमशेदपूरचा एक खेळाडू कमी झाला. ओडिशाचा मध्यरक्षक नंदकुमार शेखर याच्या पुढाकारामुळे रचली गेलेली चाल फोल ठरविण्यासाठी जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश आपला बॉक्स सोडून बाहेर आला. दरम्यान, नऊ मिनिटे बाकी असताना जमशेदपूरचा स्ट्रायकर अनिकेत जाधव याला संधी होती, पण त्याची चाल रोखली गेली.ओडिशाने जिद्दीने खेळत चाली कायम ठेवल्या. सहा मिनिटांच्या भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटात डॅनिएल लाल्हीम्पुईया याने जमशेदपूरच्या क्षेत्रात निर्माण केलेल्या दडपणाचा फायदा उठवित मॉरीसिओने गोल केला.
एकंदरीतच लिथुएनियाचा ३३ वर्षीय स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याच्या पूर्वार्धात दोन गोलांमुळे उपयुक्त आघाडी मिळवलेल्या जमशेदपूरला चांगली संधी होती, पण ओडिशाचे प्रतिनिधीत्व करणारा ब्राझीलचा २९ वर्षीय दिएगो मॉरीसिओ या बदली खेळाडूने त्यांना हताश केले. गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला त्याच्या चुकीमुळे लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. याचा जमशेदपूरला फटका बसला.