मुंबई सीटीचा नॉर्थईस्टकडून अनपेक्षित पराभव

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : बलाढ्य समजल्या जाणार्या मुंबई सीटीला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या उत्तरार्धात क्वेसी अप्पिया याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली.
गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट संघाने 10 खेळाडूंसह खेळणार्या मुंबई सिटी एफसीला 1-0 फरकाने हरविले. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी झालेल्या या लढतीत अप्पियाने 49व्या मिनिटाला केलेला पेनल्टी गोल निर्णायक ठरला, तर 43व्या मिनिटाला मध्यरक्षक अहमद जाहू याला रेड कार्ड मिळाल्यामुळे मुंबई सिटीचा एक खेळाडू कमी झाला. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा आयएसएल स्पर्धेत 14 लढतीनंतरचा पहिला विजय ठरला.
हँडबॉलमुळे पहिला गोल
उत्तरार्धातील चौथ्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. पेनल्टी फटक्यावर नॉर्थईस्ट युनायटेडचा आघाडीपटू अप्पिया याने गुवाहाटीच्या संघाचे खाते उघडले. शॉर्ट कॉर्नरवर डायलन फॉक्सचा हेडर मुंबई सिटीच्या रॉवलिन बॉर्जिसच्या हाताला लागला, हँडबॉलमुळे नॉर्थईस्टला सामन्यातील पहिला गोल नोंदविणे सोपे ठरले. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या घानाच्या 30 वर्षीय आंतरराष्ट्रीय आघाडीपटूच्या कल्पक फटक्यासमोर मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग निष्प्रभ ठरला.
विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीस जोरदार झटका बसला. अहमद जाहू याला रेड कार्ड मिळाले. मोरोक्कोच्या या खेळाडूने नॉर्थईस्टच्या कामारा याला धोकादायक टॅकल केले, त्यावेळी रेफरी आर. व्यंकटेश याने थेट रेड कार्ड दाखवून जाहूला मैदानाबाहेर काढले.
फ्री किक ठरली निष्फळ
पूर्वार्धातील खेळावर मुंबई सिटीने वर्चस्व गाजविले, पण गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सर्जिओ लोबेरांच्या मार्गदर्शनाखालील संघाने संधी निर्माण केल्या, मात्र सदोष नेमबाजीमुळे चेंडू नेटच्या बाहेरच राहिला. एका गोलच्या पिछाडीनंतर मुंबई सिटीने उत्तरार्धात बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. लोबेरा यांनी 58व्या मिनिटास गतमोसमात 15 गोल केलेल्या बार्थोलोमेव ओगबेचे याला बाहेर बोलावत जपानी खेळाडू सी गोडार्ड याला संघात सामावले. सामना संपण्यास चार मिनिटे असताना नॉर्थईस्ट युनायटेडच्या आशुतोष मेहता याने मुंबईच्या फारुख चौधरीस गोलक्षेत्राबाहेर पाडले. यावेळी मुंबईला फ्रीकिक मिळाली, पण त्याला लाभ उठवता आला नाही. रेफरींनी आशुतोषला यलो कार्ड दाखविले.