दक्षिणेतील लढाईत बंगळुरूचा रॉयल विजय

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबाद सनरायझर्सचा 10 धावांनी पराभव केला. 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा हैदराबादचा संघ सर्व गडी गमावून 153 धावाच करू शकला. बंगळुरूतर्फे देवदत्त पडीकल (Devdutt Padikkal) व एबी डिव्हिलियर्सने (a b de villiers) अर्धशतके तर त्यांच्या युझवेंद्र चहलने 3 बळी मिळवले. हैदराबादच्या जॉनी बेयरेस्टोची 61 धावांची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्सच्या डावाची सुरुवात जॉनी बेयरस्टो व कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी केली. वॉर्नरने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ सुरु केला व डेल स्टेनच्या पहिल्याच षटकात सहा धावा वसुल केल्या. मात्र वॉर्नर खेळपट्टीवर गोलंदाजांचा जास्तवेळ समाचार घेऊ शकला नाही व दुर्दैवाने धावबाद झाला. उमेशने टाकलेला चेंडू फलंदाज बेयरस्टोने थेट उमेशच्या हातात मारला मात्र त्याला तो झेल घेतला आला नाही परंतु वॉर्नरचे दुर्दैव आड आले व चेंडू थेट नॉनस्ट्रायकरच्या यष्ट्यांवर बसला व यावेळी वॉर्नर आपल्या क्रिजमधून बाहेर होता. वॉर्नर 6 धावा करून धावबाद झाला.
बेयरेस्टो – मनीषने डाव सांभाळला
धडाकेबाज फलंदाज वॉर्नर लवकर बाद झाल्यानंतर बेयरेस्टोने मनीष पांडेसोबत मिळून संघाच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. बेयरेस्टोसाबत मनीषनेही आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी मिळून बंगळुरूच्या गोलंदाजांची लय बिघडवली. दुसऱ्या गड्यासाठी या दोघांमध्ये 62 चेंडूत 71 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. युझवेंद्र चहलने मनीषला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. 89 धावांवर हैदराबादने आपला दुसरा गडी गमावला.
जॉनी बेयरेस्टो बाद
सलामीवीर जॉनी बेयरेस्टोने 2019 आयपीएलप्रमाणे या सत्रातही शानदार कामगिरी कायम ठेवली. त्याने सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. जॉनी बेयरेस्टोने केवळ 43 चेंडूंचा सामना करतान 6 चौकार व 2 षटकार लगावत 141 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. याशिवाय त्याने प्रियम गर्गसोबत मिळून तिसऱ्या गड्यासाठी 20 चेंडूत 32 धावांची भागीदारीही केली. बेयरेस्टोला चहलने त्रिफळाचित केले.
विजय शंकरला चहलने गुंडाळले
बेयरेस्टो बाद झाल्यानंतर आलेला विजय शंकर काहीच करू शकला नाही. त्याला चहलने खातेही उघडू दिले नाही व लगेच दुसऱ्या चेंडूवर शंकरला माघारी पाठवले. आता चहलला हॅटट्रिकची संधी होती मात्र अभिषेक शर्माने एक धाव घेत चहलला आपली हॅटट्रिक साजरी करू दिली नाही. यावेळी हैदराबादची स्थिती 16 षटकांत 4 बाद 127 होती व विजयासाठी आणखी 24 चेंडूत 37 धावांची गरज होती.
प्रियम गर्गही बाद
शंकर बाद झाल्यानंतर प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा हैदराबादला सुस्थितीत आणतील अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. प्रियम गर्ग 13 चेंडूत 12 धावा करून शिवम दुबेच्या गोलंदाजीत त्रिफळाचित झाला. यानंतर खेळपट्टीवर अभिषेकला सोबत करण्यासाठी राशिद खान आला. परंतु हैदराबादच्या गडी बाद होण्याचा क्रम काही थांबत नव्हता. हैदराबादने 6व्या गड्याच्या रुपात अभिषेक शर्माला गमावले. अभिषेक 7 धावा करून धावबाद झाला. हैदराबादला विजयासाठी अजूनही 18 चेंडूत 29 धावांची गरज होती व त्यांचे चार फलंदाज शिल्लक होते.
हैदराबादचा डाव गडगडला
गर्ग बाद झाल्यानंतर हैदराबादचे फलंदाज जास्त काही करू शकले नाहीत. राशिद खान, मिशेल मार्श झटपट बाद झाले. 143 धावांवर हैदराबादने 9 गडी गमावले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 18 धावांची गरज होती मात्र डेल स्टेनने संदीप शर्माला बाद करत हैदराबादचा डाव 153 धावांत आटोपला. बंगळुरूतर्फे युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 बळी मिळवले.
तत्पूर्वी, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट अँड कंपनीने पहिल्या डावात हैदराबादविरुद्ध जिंकण्यासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. येथे डाव सुरू झाला तेव्हा सलामीच्या वेळी प्रत्येकाला नवा चेहरा पाहायला मिळाला. देवदत्त पडीकलने बंगळुरूच्या डावाला सुरुवात करून दिली. त्याच्या पदार्पण सामन्यात फिंचबरोबर सलामीची जबाबदारी देण्यात आली होती जिथे त्याने स्वतःला सिद्ध केले. येथे पडीकलने 42 चेंडूत शानदार 56 धावा करून बंगळुरूला जबरदस्त सुरुवात करून दिली. दरम्यान अॅरोन फिंचनेही त्याला चांगली साथ दिली.
दोघांनीही संघाची धावसंख्या 10 षटकांत कोणत्याही नुकसानीशिवाय 86 धावांवर पोहोचवली होती. दरम्यान, पडीकलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतरच विजय शंकरने त्याला 56 धावांवर बाद केले. त्यानंतर लवकरच पुढच्याच चेंडूवर अॅरोन फिंचही पॅव्हेलियनमध्ये परतला.
बंगळुरूचे आता 2 बाद 90 धावा झाल्या होत्या, पण त्यानंतर अशी जोडी आली ज्याची सर्व चाहते वाट पहात होते. खेळपट्टीवर आता विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सची जोडी होती. दोघांनीही येताच डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहलीने त्याचा झेल दिला आणि 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाने 123 धावांत 3 गडी गमावले होते.
आता शिवम दुबे खेळपट्टीवर डिव्हिलियर्सला साथ देण्यासाठी आला होता. एकीकडे शिवम दुबे सतत स्ट्राईक रोटेट करत होता तर दुसरीकडे डिव्हिलियर्स मोठे फटकेबाजी करत होता. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 18 षटकांत 141 धावांवर नेली. यानंतर डिव्हिलियर्सने गिअर्स बदलले आणि संदीप शर्माच्या षटकात सलग दोन षटकार ठोकले आणि संघाची धावसंख्या 150 पर्यंत वाढवली आणि यासह त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. डिव्हिलियर्सने हे काम फक्त 29 चेंडूंत केले. पण तो वेगळा शॉट घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. डिव्हिलियर्सने येथे 29 चेंडूंत 51 धावा केल्या आणि बंगळुरूने हैदराबादसमोर 5 विकेट गमावून 164 धावांचे लक्ष्य ठेवले.
पदार्पणात 50 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
102* धावा : ख्रिस गेल वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (2011)
54* धावा : एबी डिव्हिलियर्स वि. कोची टस्कर केरळ (2011)
52* धावा : युवराज सिंग वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (2014)
52 धावा : एस. गोस्वामी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (2008)
56 धावा : देवदत्त पडीक्कल वि. सनरायझर्स हैदराबाद (2020)