IPL मध्ये मराठीत समालोचन करा, अन्यथा…

मनसेचा डिस्ने-हॉटस्टारला इशारा. सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे. मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.

हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असं मनसेनं म्हटलं आहे. सध्या आयपीएलचं समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय दिलेला नाही. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग मराठी आहे. असं असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचं दिसत आहे, अशा शब्दात मनसेने कंपनीला खडसावलं आहे.

आम्ही देतो मराठी समालोचक!
आयपीएल क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू. पण नुसतीच चालढकल केलीत, तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या.., असं कॅप्शन देत केतन नाईक यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केलं आहे. अन्य एका ट्विटमध्ये नाईक यांनी, क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठी भाषेत का नसावी? महाराष्ट्रात एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक आहेत. गरज असल्यास आम्ही शोधून देऊ, अशी ऑफरही दिली आहे.

आयपीएल संपण्यापूर्वी निर्णय घ्या!
आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती मनसेने केली आहे. कंपनीने निर्णय घेतला नाही, तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करावं लागेल, असंही मनसेनं म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!