मुंबई इंडियन्सचा कोलकातावर थरारक विजय, शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मॅच फिरली

कमी स्कोअर करुनही मुंबईचा अविश्वसनीय विजय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : आयपीएल २०२१च्या पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्स संघानं दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला. सुरुवातीपासूनच कोलकाताचा संघ मुंबईवर भारी पडताना दिसत होता. मात्र शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये मुंबईनं शानदान कामगिरी करत संपूर्ण चित्रच पलटलं.

मुंबईनं पहिल्यांना बॅटिंग करत कशीबशी १५०च्या पार धावसंख्या उभारली. मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला संधीचे सोने करता आले नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळले. त्याने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा धारण करत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर मुंबईला आपली धावगती वाढवता आली नाही. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक 43 धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बोल्ड केले.

सूर्यकुमार-रोहितच्या विकेटनंतर कोलकाताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. 18व्या षटकात मॉर्गनने अष्टपलू खेळाडू आंद्रे रसेलच्या हातात चेंडू सोपवला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. रसेलव्यतिरिक्त पॅट कमिन्सने 2 बळी घेतले. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 152 धावा केल्या. पण 153 धावा करतानाही कोलकाताच्या नाकी नऊ आले.

शेवटच्या षटकात कोलकाताला 15 धावांची गरज होती. मात्र त्याआधीच्या ओव्हरमध्ये कमाल गोलंदाजी बुमराहने केली. त्याआधी ४ ओव्हरमध्ये ४ विकेट्स घेत राहुल चहरने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. ज्यावर बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टने विजयाचा कळस चढवला. दरम्यान, त्याआधी शुभमन गिल आणि नितिश राणानं आश्वासक सुरुवात केली होती. मात्र राणाच्या अर्धशतकी खेळीनंतरही कोलकाताला १५३ धावा करता आल्या नाहीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!