#IPL-2020 : आज ‘हाय व्होल्टेज’ डबल धमाका

दुबईमध्ये खेळविल्या जात असलेल्या आयपीएल-2020 क्रिकेट स्पर्धेत सुपर संडेला दोन सामन्यांचा आस्वाद क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दुबईत खेळविण्यात येत असलेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल-2020 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत सुपर संडे संस्मरणीय ठरणार आहे. एकाच दिवशी लागोपाठ दोन सामन्यांचा आस्वाद घेण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. रोहीत शर्माचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) डेविड वॉर्नरच्या सन रायझर्स हैदराबादशी (Sun Risers Hyderabad) दोन हात करणार असून के. एल. राहुलचा (K. L. Rahul) किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) एम. एस. धोनीच्या (M. S. Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सशी (Chennai SuperKings) भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सला नमवून श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेजर्स बेंगलुरू दुसर्‍या स्थानावर आहे. हैदराबादला पराभूत करून दुसऱ्या स्थानावरून पहिलं स्थान पटकावण्याच्या प्रयत्नात मुंबई इंडियन्स असतील. मात्र हैदराबादकडे समतोल संघ असून तेही चौथ्या स्थानावरून अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यामुळं शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजल्यापासून होणार हा सामना हाय व्होल्टेज ठरेल, यात शंकाच नाही. आफ्रिकन सलामीवीर तथा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकचा परफॉर्मन्स ही मुंबईची डोकेदुखी ठरत आहे. त्याच्या जागी ऑस्टे्रलियन फलंदाज खिस लिन याला संधी मिळू शकते.

संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणारा किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातल्या सामन्यावरही प्रेक्षकांचं लक्ष असेल. कारण सलामीच्या पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभूत करून दणक्यात सुरुवात करणार्‍या धोनीच्या चेन्नईला ओळीने तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळं हा संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानी आहे. फलंदाजीत चांगली कामगिरी करणार्‍या पंजाबचीही तशीच गत झाली असून केवळ सरस धावगतीच्या जोरावर ते शेवटून दुसर्‍या स्थानी आहेत. त्यामुळं रविवारचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चेन्नईच्या संघात अनेक हुकमी खेळाडू असूनही प्रतिस्पर्धी संघांच्या रणनीतीमुळं त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

पंजाबकडे के. एल. राहुल, मयंक अग्रवाल असे ताकदवान फलंदाज आहेत. सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजाला मिळणारी ऑरेंज कॅप याच संघाकडे कायम आहे. कप्तान के. एल. राहुलकडून ती मयंक अग्रवालकडे आली, इतकाच काय तो फरक. मात्र सर्व गोलंदाजांकडून त्यांना हवी तशी साथ मिळत नाही. त्यातही मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेलनं प्रत्येकी आठ विकेट घेउन दिल्लीच्या रबाडासह संयुक्तपणे पहिलं स्थान मिळवलं आहे. परंतु इतर गोलंदाज धावांची खिरापत वाट असल्यामुळं गेल्या दोन सामन्यांत मोठी धावसंख्या उभारूनही त्यांना पराभव पत्करावा लागला.

मुंबई आणि हैदराबाद चांगल्या लयीत असून दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या समतोल परफॉर्मन्समुळे सुपर संडेला जोरदार टक्कर अपेक्षित आहे. दुसरीकडे, चेन्नई आणि पंजाबमध्ये कोण वरचढ ठरेल, याबाबतही तितकीच उत्सुकता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!