#INDvsENG #T20 | शानदार, जिंदाबाद, जबरदस्त! टीम इंडियाचा सामन्यासह दिमाखदार मालिका विजय

अखेरच्या सामन्यासह मालिकाही खिशात

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं ३-२ने इंग्लंडला धूळ चारली आणि मालिकेवर आपलं नाव कोरलंय. पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्या टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. २२५ या बलाढ्य धावसंख्येचा सामना करताना सुरुवात इंग्लंडनं चांगली केली होती. मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना यश आलं नाही. उत्तम गोलंदाजी आणि शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं दिमाखदार विजय मिळवलाय.

इंग्लंडची आश्वासक सुरुवात, पण..

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात जेसन रॉय बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर डेव्हिड मलान फलंदाजीला आला. त्याने हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात फटकेबाजीला सुरुवात केली. पंड्याला पहिल्याच षटकात 18 धावा मोजाव्या लागल्या. पहिल्या विकेटनंतर कोणताही दबाव न घेता जोस बटलर-डेव्हिड मलानने भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. इंग्लंडने चार षटकात 41 धावा जोडल्या. तर, पाचव्या षटकात इंग्लंडने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल चहर यांच्या षटकातही बटलरने खूप धावा वसूल केल्या. त्यानंतर मोठे फटके, दुहेरी धावा यांचे सुंदर मिश्रण करत या दोघांनी दहाव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.

डेव्हिड मलानने 33 चेंडूत मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. मलानपाठोपाठ बटलरने 30 चेंडूत अर्धशतक साकारले. हे दोघे भारतासाठी चिंता ठरत असताना भुवनेश्वर मदतीसाठी धावून आला. त्याने बटलरला पंड्याकरवी झेलबाद केले. आपल्या 52 धावांच्या खेळीत बटलरने 4 षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी केली. बटलरनंतर शार्दुल ठाकूरने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडत इंग्लंडला अडचणीत टाकले. बेअरस्टोने 7 धावा केल्या. त्यानंतर दबावात खेळणारा मलानही शार्दुलचा बळी ठरला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. मलानपाठोपाठ कर्णधार मॉर्गनकडून चमत्कारिक खेळीची अपेक्षा होती. मात्र, तोही अपयशी ठरला. त्याला पंड्याने झेलबाद केले.

टीम इंडियाची रनमशीन जोमात

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 224 धावा उभारल्या. टी-20 क्रिकेटमध्ये प्रथमच सलामी देण्यासाठी विराट आणि रोहित मैदानात उतरले. आदिल रशीदने इंग्लंडसाठी पहिले षटक टाकले. या षटकात रशीदने तीनच धावा दिल्या. पुढच्या षटकात भारताच्या सलामीवीरांनी आर्चरला दोन चौकार खेचले. पाच षटकात या दोघांनी 44 धावा फलकावर लावल्या. पुढच्या षटकात मार्क वूडला षटकार ठोकत विराटने संघाचे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर रोहितने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली. आठव्या षटकात सॅम करनला अप्रतिम षटकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 30 चेंडूत रोहितने आपले अर्धशतक साकारले. रोहित मोठी खेळी करणार असे वाटत असताना बेन स्टोक्सने त्याला बाद केले. रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत 64 धावा केल्या.

हिटमॅननंतर सूर्यकुमार-हार्दिक आक्रमक

विराट-रोहितने 94 धावांची यशस्वी सलामी दिली. या मालिकेतील ही भारताची सर्वोत्तम सलामी होती. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार ठोकत दहाव्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इंग्लंडवर आक्रमण केले. इंंग्लंडच्या बाराव्या षटकात या दोघांनी ख्रिस जॉर्डनला चार चौकार खेचले. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यकुमारला आदिल रशीदने बाद केले. मोठा फटका खेळलेल्या सूर्यकुमारचा ख्रिस जॉर्डनने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. त्याने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर पंधराव्या षटकात हार्दिक पंड्या-विराट कोहलीने संघाचे दीडशतक पूर्ण केले. सलामीला आलेल्या विराटने 16व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकापर्यंत या दोघांनी हाणामारी सुरूच ठेवली. 18व्या षटकात भारताने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मार्क वूड महागडे ठरले. जॉर्डनला 4 षटकात 57 तर वूडला 53 धावा कुटल्या गेल्या. आदिल रशीद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!