आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ : महिलांनी लुटलं सोनं

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली : आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने इंडिनेशियावर 6-2 च्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय पुरुष संघाला मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 3.5 – 4.5 अशा एका गुणाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
या आधीही भारतीय संघाने ऑगस्ट महिन्यात फिडे ऑनलाईन ऑलम्पियाड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे कोनेरु हम्पी, डी. हरिका यासारख्या खेळाडूंव्यतिरीक्त स्पर्धेत उतरलेल्या भारतीय महिला संघाने बहारदार कामगिरी केली.
नंदीधाने मिळवून दिली आघाडी
महिलांच्या अंतिम फेरीत महिला ग्रँडमास्टर पी.व्ही. नंदीधाने पहिला विजय मिळवत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर पद्मिनी राऊतने लागोपाठ दुसरा विजय मिळवत भारतीय महिलांची आघाडी भक्कम केली. यानंतर फॉर्मात असलेल्या आर.वैशालीला आपल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावं लागलं. ज्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र यानंतर भारतीय महिला संघाने दमदार पुनरागमन करत इंडोनेशियाला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.
पुरुषांना दोन पराभव पडले महागात
पुरुषांच्या अंतिम फेरीत बी. अधिबन आणि एस. पी. सेतूरामन यांचा झालेला पराभव भारताला महागात पडला. अनुभवी के. साईकिरणने ऑस्ट्रेलियाच्ये जेम्स मॉरीसला हरवून सामन्यात रंगत निर्माण केली. यानंतर निहाल सरीन आणि तेमूर क्युबोकारोव्ह यांच्यातला सामना बरोबरीत सुटल्यामुळे अखेरीस बाजी कोण मारणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार सूर्यशेखर गांगुलीने ऑस्ट्रेलियाच्या इलिंगवर्थला हरवत पारडं भारताच्या बाजूने झुकवलं परंतू क्युबोकारोव्हने दुसऱ्या सामन्यात सरिनवर मात करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन करुन दिलं. अधिबन आणि ससिकरन यांचे सामने अनिर्णित राहिल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला विजयी घोषित करण्यात आलं.