ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव!

भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका 2-1 नं जिंकली

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्रिस्बेन : भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका 2-1 नं जिंकताना ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव केला. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरलं.

फलंदाजांनी विजय खेचून आणला

सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (91), अनुभवी चेतेश्वर पुजारा (56) आणि रिषभ पंत (85 नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 8 गडी राखून विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.

सांघिक कामगिरी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 294 धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर 328 धावांचं आव्हान पार केलं.

32 वर्षांनंतर ”गाबा”वर विजय

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या डावांत 9 बळी घेत ऑस्ट्रेलियाला 294 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील 32 वर्षांपासन ‘अजिंक्य’ असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारतानं चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. याआधी 236 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारतानं हा विक्रम मोडीत काढला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!