IND vs NZ: टीम इंडियाने रायपूरमध्ये न्यूझीलंडचा उडवला धुव्वा , ८ विकेटनी जिंकला सामना !
इंडिया वी. न्यूझीलँड, मास्टर-कार्ड ट्रॉफी २०२३: रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या घातक गोलंदाजी पुढे ढेपाळले किवी. टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 109 रन्सचं होतं टार्गेट, जे टीम इंडियानं अगदी सहज गाठलं.

ऋषभ | प्रतिनिधी
२१ जानेवारी २०२३ : इंडिया वी. न्यूझीलँड, मास्टर-कार्ड ट्रॉफी २०२३- 2ND ODI
IND vs NZ 2nd ODI, रायपूर : टीम इंडियाने रायपूर ODI मध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आहे. अशा प्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला विजयासाठी 109 धावा करायच्या होत्या. टीम इंडियाने अवघ्या 20.1 षटकांत केवळ 2 गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
रोहित शर्माने अर्धशतक केले
टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 51 धावांची इनिंग खेळली. भारतीय कर्णधाराने 50 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय शुभमन गिलने 40 धावा केल्या तर इशान किशन 08 धावांवर नाबाद परतला. शुभमन गिलने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. तर विराट कोहलीने 11 धावा केल्या.
किवी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकांत केवळ 108 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 109 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे 8 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. पाहुण्या संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. याशिवाय शेवटच्या सामन्याचा हिरो मायकेल ब्रेसवेलने 22 तर मिचेल सँटनरने 27 धावा केल्या.
मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये होणार आहे
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद शमी हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. मोहम्मद शमीने 6 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांना 2-2 असे यश मिळाले. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी 1-1 विकेट आपल्या नावे केली. मात्र, या विजयासह टीम इंडियाने मालिका जिंकली. त्याचवेळी, दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. शेवटचा वनडे जिंकून न्यूझीलंड संघाची धूळ साफ करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
मुख्य म्हणजे, रायपूर येथे भारताकडून झालेल्या पराभवानंतर, न्यूझीलंड MRF टायर्स ICC पुरुष एकदिवसीय संघ क्रमवारीत क्रमांक 2 वर घसरला, ज्यामुळे इंग्लंडने अव्वल स्थान मिळवले. ताजी क्रमवारी तुम्ही खाली पाहू शकता.
