गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये…

लखनौ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव : राशिद खानचे ४ बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे : येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव केला. गुजरातचा या हंगामातील हा ९वा विजय आहे. यासह हार्दिक पांड्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. आयपीएल २०२२मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात हा पहिला संघ आहे.
हेही वाचाः’या’ तालुक्यात उभारणार आयआयटी प्रकल्प…

लखनौ संघ ८२ धावांत गारद

गुजरात टायटन्सने प्रथम खेळताना २० षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ १३.५ षटकांत अवघ्या ८२ धावांत गारद झाला. राशिद खान, यश दयाल आणि आर साई किशोर यांनी गुजरातकडून चमकदार कामगिरी केली. राशिदने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी यश आणि किशोर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सलामीवीर शुभमन गिलच्या झंझावाती अर्धशतकानंतरही अवेश खानच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी येथे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुजरात टायटन्सला ४ बाद १४४ धावांवर रोखले.
हेही वाचाःओबीसी दाखल्यासाठी ‘ती’ अट रद्द करावी…

जेसन होल्डर ठरला महागडा

आवेश हा सुपर जायंट्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने २६ धावांत दोन बळी घेतले. मोहसीन खानने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत १८ धावा देत एक बळी घेतला. कृणाल पांड्याने चार षटकांत २४ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. चार षटकांत ४१ धावांत दोन बळी घेत जेसन होल्डर महागडा ठरला. गिल टायटन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ४९ चेंडूंच्या खेळीत सात चौकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावा केल्या. गिलने डेव्हिड मिलर (२६) सोबत चौथ्या विकेटसाठी ५२ आणि राहुल तेवतिया (१६ चेंडूत नाबाद २२, चार चौकार) सोबत पाचव्या विकेटसाठी ४१ धावांची भागिदारी केली. टायटन्सच्या संपूर्ण डावात १६ चौकारांचा समावेश होता, यावरून लखनौच्या गोलंदाजांच्या वर्चस्वाचा अंदाज लावता येतो.      

टायटन्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही

टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या अवघ्या आठ धावांवर असताना वेगवान गोलंदाज मोहसीन खानने तिसर्याच षटकात ऋद्धिमान साहाला (५) आवेश खानकरवी झेलबाद केले. मॅथ्यू वेडने (१०) दुष्मंता चमिरावर लागोपाठ दोन चौकार मारले पण तो आवेशच्या चेंडूवर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककडे झेलबाद झाला. पॉवर प्लेमध्ये टायटन्सचा संघ केवळ २ बाद ३५ धावाच करू शकला. ही त्यांची पहिल्या सहा षटकांतील सर्वात कमी धावसंख्या आहे. सलामीवीर गिलने एका टोकाला सांभाळले. मोहसीन, चमिरा आणि आवेश या तिन्ही वेगवान गोलंदाजांवर त्याने चौकार ठोकले. त्याने हार्दिकसह नवव्या षटकात संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली.

गिलने चौकार मारून चौकाराचा दुष्काळ संपवला

पुढच्याच षटकात लोकेश राहुलने चेंडू आवेशकडे सोपवला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला (११) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पांड्याने ऑफ-साइडच्या बाहेर चेंडू मारण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षकडे झेल दिला. गिलने २६ चेंडूत आवेशवर चौकार मारून चौकाराचा दुष्काळ संपवला आणि त्यानंतर कृणाल पांड्यालाही चौकार लगावला. टायटन्सच्या फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये चौकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागला कारण लखनौ संघाला धावगती रोखण्यात यश आले. डेव्हिड मिलरसारखा आक्रमक फलंदाज त्याच्या पहिल्या २१ चेंडूंवर फक्त एक चौकार मारू शकला.

तेवतियाने शेवटच्या षटकात मारले तीन चौकार

मिलरने १६व्या षटकात होल्डरवर षटकार खेचून संघाचे शतक पूर्ण केले, पण त्याच षटकात आयुष बडोनीला डीप थर्ड मॅनकडे झेलबाद केले. त्याने २४ चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. गिलने मोसमातील चौथे अर्धशतक ४२ चेंडूत चमिराच्या चेंडूवर पूर्ण केले आणि त्यानंतर त्याच षटकात सलग दोन चौकार मारले. तेवतियाने शेवटच्या षटकात होल्डरवर तीन चौकार मारून संघाची धावसंख्या १४० धावांच्या पुढे नेली.

      

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!