एफसी गोवा आणि नॉर्थईस्टचा सामना ड्रॉ

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरी सुटलीये, फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर पहिल्या सत्रातील बरोबरीची कोंडी अखेरपर्यंत सुटू शकलीये.
गिनीचा २९ वर्षीय स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याने पेनल्टीवर.नॉर्थईस्टचे खाते उघडले. गोव्याने प्रतिआक्रमणाची क्षमता प्रदर्शित करीत तीन मिनिटांत बरोबरी साधली. स्पेनच्या ३६ वर्षीय इगोर अँग्युलो याने गोल केला.
नॉर्थईस्टचे प्रशिक्षक न्यूस यांनी दुसऱ्या सत्रात शुभाशिष रॉय याच्याऐवजी गुरमीत सिंग याला बदली गोलरक्षक म्हणून पाचारण केलेय. दुसऱ्या सत्रात चुरश शिगेला पोचली असताना गोव्याचा गोंझालेझ आणि नॉर्थईस्टचा बदली खेळाडू रोच्छाईझेला यांच्यात किरकोळ झटापट झालीये.
गिनीच्या २९ वर्षीय स्यीलानं याआधी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध बदली खेळाडू म्हणून अखेरच्या मिनिटाला नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली होती. त्यामुळे प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांनी त्याला अपेक्षेप्रमाणे स्टार्ट दिली. स्यीलाने प्रशिक्षकांचा तसेच संघाचा विश्वास सार्थ ठरविला.३८व्या मिनिटाला स्यीलाने छातीने चेंडूवर नियंत्रण मिळवित गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्यावेळी गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने त्याला धक्का देत पाडले. त्यामुळे रेफरी क्रीस्टल जॉन यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल केली. स्यीला पेनल्टी घेत असतानाच नॉर्थईस्टचा लालरेम्पुईया फानाई आधीच पुढे सरसावला. स्यीलाने लक्ष्य साधले, पण हा प्रयत्न अवैध असल्याचा इशारा झाला. परिणामी स्यीलास पेनल्टी पुन्हा घ्यावी लागली. त्याने यावेळीही गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याचा अंदाज चुकविला. स्यीलाचा हा मोसमातील दुसरा, तर नॉर्थईस्टचा आयएसएलमधील ९९वा गोल ठरला. गोव्याने तीन मिनिटांत बरोबरी साधली. ४३व्या मिनिटाला मध्य फळीतील ब्रँडन फर्नांडिस याने जादुई चाल रचली. त्याने मोकळीक मिळवित गोलक्षेत्रात अप्रतिम पास देताच अँग्युलोने गोलची कामगिरी फत्ते केली.
३४व्या मिनिटाला स्यीला यास उत्तम संधी मिळाली होती. नॉर्थईस्टच्या बचाव फळीतील गुरजींदर कुमारने रचलेल्या चालीवर त्याने हेडिंग केले, पण ते स्वैर होते. चेंडू नेटच्या बाहेरून जाताच स्यीला यास निराशा लपविता आली नाही.
नॉर्थईस्टची तीन सामन्यांतील ही दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी दुसरे स्थान राखले. जुआन यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याची तीन सामन्यांनंतर पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली. दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दोन गुण झाले असून गुणतक्त्यात सातवे स्थान आहे