FC गोवा ‘इगो’ बंगळूरूवर भारी

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव: सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (ISL) एफसी गोवा आणि बंगळुरू एफसी या तुल्यबळ प्रतिस्पध्यांमधील लढत थरायक खेळ होऊन २-२ अशी बरोबरीत सुटलीये. दोन गोलांच्या पिछाडीनंतर गोव्यानं पारडं फिरवित एक गुण खेचून आणलाय. स्पेनचा ३६ वर्षीय स्ट्रायकर इगोर अँग्युलो यानं चार मिनिटांच्या अंतरानं दोन गोल करीत गोव्याला वाचवलंय.
गोव्यासारखा आक्रमक शैलीचा प्रतिस्पर्धी समोर असूनही खातं उघडण्याची शर्यत बंगळुरूनं जिंकलीये. पहिल्या सत्रात अर्ध्या तासाचा खेळ संपण्याच्या मार्गावर असताना मध्य फळीतील हर्मनज्योत खाना याने चाल रचली. त्याने श्रो इनच्या संधीचा फायदा उठवित चेंडू गोलक्षेत्रात भक्कमपणे टाकला. त्याने चेंडूला उंचीही चांगली दिली. गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे मेंडोझा याने हेडींगच्या जोरावर चेंडू बाजूला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू नेटसमोरच गेला.
सिल्वाने मग पुढे सरसावत चपळाईने हेडिंग करीत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकवलंय, दुसय्रा सत्रात बंगळुरूनं आघाडी वाढविलीय. मध्य फळीतील एरिक पार्टालू याच्या चालीवर बचाव फळीतील जुआनन यानं गोल केला. डेशोर्न ब्राऊन यानं हेडिंगकरवी चेंडू पार्टालूच्या दिशेनं मारला. मग पार्टालूने हेडिंगवरच जुआननसाठी संधी निर्माण केलेली. जुआनन यानं गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकवित दमदार फिनिशिंग केले.

गोव्याने मग प्रतिआक्रमण रचले. मध्य फळीतील सॅन्सन परेराने डावीकडून चाल रचत बदली खेळाडू ब्रँडन फर्नाडिसला पास दिला. आणखी एक बदली खेळाडू अल्बर्टो नोग्यूला यानं ही चाल पुढं नेली. यातून संधी मिळताच अँग्युलोने गोल करीत गोव्याचं खातं उघडत पिछाडीही कमी केलेली.यानंतर गोव्यानं तीन मिनिटांत बरोबरी साधली. ५७व्या मिनिटाला प्रीन्सटन रेबेलो याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या ब्रँडन यानेच ही चाल रचली. त्याने आणखी एक बदली खेळाडू अलेक्झांडर जेसुराज याला अप्रतिम पास दिला. गोलक्षेत्रात उजवीकडून चेंडू मिळताच एदू बेदीयाच्या साथीत चाल पुढे नेली. मग बेदीयाने संतुलन साधत अँग्युलोच्या दिशेनं गोल मारला. अँग्युलोने छातीच्या मदतीने चेंडूवर नियंत्रण मिळवित सफाईदा फिनिशिंग केले. कार्लेस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी बंगळुरूची सुरुवात सकारात्मक होती. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी पहिला प्रयत्न केला. आघाडी फळीतील क्रिस्टीयन ओप्सेथ यानं मध्य फळीतील एरीक पार्टाल याच्या साथीत आगेकूच केली होती. गोव्याला ही चाल सफाईनं रोखता आली नाही. त्यामुळे सुनील छेत्रीला संधी मिळाली. त्यानं नेटच्या दिशेने फटका मारला, पण तो स्वैर ठरला.
पाचव्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक जोर्गे मेंडोझा यानं चेंडूवर ताबा मिळवून डाव्या बाजूनं मुसंडी मारली, पण बंगळुरुचा बचावपटू फ्रान्सिस्को गोंझालेझ यानं ही चाल रोखली. दोन मिनिटांनी युवा आशिक कुरुनीयन यानं डावीकडून मुसंडी मारली. मग त्यानं उजवीकडे वळत प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवून फटका मारला, पण नवाझने व्यवस्थित अंदाज घेत चेंडू रोखला. गोव्याकडून पहिल्या थेट प्रयत्न पूर्वार्धाच्या अखेरीस झाला. आघाडी फळीतील इगोर अँग्युलो याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने तो अडविला.