टीम इंडियाचा मेन्टॉर म्हणून धोनी १ रुपयाही मानधन घेणार नाहीये!

जय शाह यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टी -20 साठी भारतीय संघाची घोषणा सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. तेव्हा कोणत्याही खेळाडूच्या संघातील नावापेक्षाची चर्चा जास्त होती ती महेंद्रसिंह धोनीची! महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचे मेंटॉर बनवण्यात आलं. आता हाती आलेल्या माहितीनुसार, धोनी या नवीन भूमिकेसाठी एक रुपयाही मानधन घेणार नाहीये.

काय म्हणाले जय शाह?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनएई या वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात ही माहिती दिली. जय शाह म्हणाले, ‘एमएस धोनी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक (मेन्टॉर) म्हणून त्याच्या सेवेसाठी कोणतंही मानधन घेत नाहीये.’

काय आहे वाद?

खरंतर, धोनीच्या मार्गदर्शक पदावर नियुक्ती झाल्यानंतर 24 तासांच्या आतच अनेकांनी आक्षेप घेतला होता. धोनीविरुद्ध हितसंबंधांच्या संघर्षाची तक्रार बीसीसीआय सर्वोच्च परिषदेकडे करण्यात आली. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी लोढा समिती सुधारणांचा हवाला देत आठवण करून दिली होती की एक व्यक्ती दोन पदं भूषवू शकत नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, धोनी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे आणि आता त्याला मार्गदर्शक बनवणे नियमांच्या विरोधात आहे, असाही दावा केला जात होता.

…म्हणून मानधन नाकारलंय?

आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचंही नवं विधान संपूर्ण प्रकरणाशी जोडलं जाणं स्वाभाविक आहे. जर धोनीने या नवीन भूमिकेसाठी एक रुपयाही घेतला नाही, तर याचा अर्थ असा की त्याच्यावरील आरोप कुठेही सिद्ध होता नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक यष्टीरक्षक फलंदाज धोनीने भारताला दोन विश्वचषक विजेतेपद मिळवून दिलेत. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी -20 विश्वचषक आणि 2011 मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक मिळवून देण्यात धोनीनं महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

धोनी सध्या त्याच्या आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. टीम सीएसके केवळ पहिल्या प्लेऑफमध्ये पोहोचली नाही तर आता 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुनर्संचयित झालेल्या टी -20 लीगच्या अंतिम फेरीतही या संघानं प्रवेश केला आहे. धोनीची सीएसके 15 ऑक्टोबरला फायनल खेळणार आहे. दरम्यान, त्याआधी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 13 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर -2 ची मॅच होईल. या सामन्यातील विजेता संघ धोनीच्या सीएसकेशी फायनलमध्ये भिडणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!