कर्णधाराने पळ काढणे चुकीचे -धोनी

Goan Varta Live | प्रतिनिधी
शारजाह : सातत्याने केलेल्या सुमार कामगिरीमुळे संघ पराभूत होत असेल तर कर्णधाराने पळ काढणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी उर्वरित तिन्ही सामन्यांत खेळणार असून संघात गरजेनुसार आवश्यक ते बदल करून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केलीय.
चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून संपूर्ण हंगामादरम्यान फलंदाजांचे अपयश त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरलंय. ‘‘स्पर्धेच्या दुसऱ्या लढतीपासूनच आम्ही संघ म्हणून खेळण्यात अपयशी ठरलो. आता पुढील तीन सामन्यांत पुढील हंगामाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आमच्याकडे वेळ असून कर्णधाराने अशा वेळी पुढाकार घेणे गरजेचंये. त्यामुळे मी तिन्ही लढतींमध्ये खेळताना दिसेन,’’ असं धोनी म्हणाला.
चेन्नईचे 12 सामन्यांतून सहा गुण झाले असून त्यांचे कोलकाता आणि पंजाबविरुद्धचे सामने बाकी आहेत. ‘‘पराभवाची 100 कारणे असू शकतात, परंतु संघातील प्रत्येकाने आपण आपल्या क्षमतेनुसार खेळ केला का? हा प्रश्न स्वत:लाच विचारावा. खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र स्पर्धेत कायम राहिले. तुम्हाला नशिबाची साथ मिळणे गरजेचे असतं. परंतु तसेही घडले नाही. अनेक सामन्यांत आम्हाला नाणेफेक जिंकून फलंदाजी करायची होती, परंतु नेमकी त्या वेळी आम्ही नाणेफेक गमावली,’’ असेही धोनीने सांगितलं.
हेही वाचा
हडफडेत आयपीएलवर कोट्यवधींची सट्टेबाजी